AusvsInd : अखेरच्या काही मिनिटांत मिळाले बारा वाजण्याचे संकेत!

सुशांत जाधव
Sunday, 10 January 2021

चौथा कसोटी सामना अगदी रंगतदार परिस्थिती पोहचला आहे. पण..

AusvsInd : पांढऱ्या कपड्यातील रंगतदार सामना नेमका कसा असतो? असा प्रश्न जर एखाद्या क्रिकेट चाहत्याला पडला तर सिडनीच्या मैदानातील सामना याच एक उत्तम उदाहरण आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कांगारुंनी दमदार सुरुवात केली. पहिला दिवस ऑस्ट्रेलिया आणि पावासानं गाजवला. त्यानंतर दुसरा दिवस पुन्हा भारतीय संघाच्या बाजूने झुकला. स्मिथचे शतक वगळता रविंद्र जडेजाची जादू भारतीय क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळाली.

हिटॅमन रोहित आणि शुभमन यांनी भारताला दमदार सुरुवात करुन दिली आणि टीम इंडियाची बल्लेबल्ले झाली. पहिल्या डावात या जोडीनं अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर रोहित बाद झाला आणि अर्धशतकानंतर शुभमन गिलनं मैदान सोडलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाच्या धावफलकावर 2 बाद 96 धावा होत्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हाची परिस्थिती ही अगदी 'सेम टू सेम' आहे. गणित थोड उलट झालय. ते म्हणजे दुसऱ्या डावात शुभमन पहिला आउट झाला आणि रोहित अर्धशतक करुन परतला.

चौथ्या दिवसातील खेळ थांबण्यासाठी अखेरची काही मिनिटे शिल्लक असताना कमिन्सच्या चेंडूवर स्वाभाविक पूल फटका खेळताना रोहितने विकेट गमावली आणि सामना पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं झुकला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत होते. पुढचा दिवस कसा खेळायचा? हा मोठा प्रश्न टीम इंडियासोबत असेल. पुजारा ज्या गियरमध्ये खेळतोय त्या गियरवर अजिंक्य रुबाब कायम ठेवणं टीम इंडियाला जमणार का?  हा देखील एक मोठा प्रश्न आहे. पहिल्या डावात भारतीय क्रिकेट चाहतांची झोप उडायच्या आधीच हे दोघही तंबूत परतले होते. असच काहीतरी पाचव्या दिवशी घडलं तर टीम इंडियाचा पराभव अटळ आहे. 

जर ही वेळ येऊ द्यायची नसेल तर अजिंक्य आणि चेतेश्वर पुजाराला किमान भारतीय चाहते झोपेतून जागे होईपर्यंत तरी टिकावं लागेल. टीम इंडिया जर टेस्ट वाचवण्याच्या इराद्याने खेळली तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. अजिंक्य रहाणेचा विचारा तसा नाही हे रोहितची विकेट पडल्यावर दिसून आले. अखेरच्या टप्प्यात जेव्हा विकेट पडते त्यावेळी साधारणत: नाईट वॉचमन पाठवण्याची कसोटीत एक प्रथा आहे. अजिंक्य रहाणे ही गोष्ट डोक्यातून काढून बाजूला ठेवत स्वत: मैदानात उतरला. कदाचित आणखी एखादी विकेट पडली तर दबाव वाढेल, या उद्देशानेच त्याने स्वत: मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असावा. त्याचा हा अंदाज भारतीय संघ अजूनही सकारात्मक असल्याचे दाखवून देणार आहे. सेनापतीच्या सकारात्मकेताल शिलदारांची साथ लाभणार का ते उद्याच कळेल.    

संघाला जिंकायचे असेल तर पुजाराने गियर बदलण्याचीही गरज निश्चितच आहे. सध्याच्या घडीला सामन्याचा निकाल हा तिन्ही बाजूने खुला आहे. पहिला कल हा निश्चितच ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकणार आहे. पुजाराने जर अधिक काळ मैदानात काढला तर भारताचा पराभव टळेल पण भारत जिंकणार नाही, ही काळ्या दगडावरील अगदी पांढरी रेघ आहे. पुजारा लवकर बाद झाला आणि हनुमा विहारीची साथीनं अजिंक्यन गाडा हकला तर रविंद्र जडेजाही भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.  या तिन्ही शक्यता सध्याच्या घडीला दिसत असल्या तरी  काही मिनिटांचा खेळ शिल्लक उरला असताना रोहितची पडलेली विकेट ही टीम इंडियाचे बारा वाजणार याचा संकेत देणारी होती. सिडनीतील रेकॉर्डही भारताच्या बाजूने नाही. या मैदानात केवळ एकच सामना टीम इंडियाने जिंकला आहे. याला खूप जमाना उलटून गेलाय. जवळपास 5 सामने अनिर्णित राखण्यात यश मिळालं आहे. 


​ ​

संबंधित बातम्या