'सुंदर' ते 'ध्यान' उभे ब्रिस्बेनमदी!

सुशांत जाधव
Sunday, 17 January 2021

"सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवुनिया!" तुकोबांनी पाडुंरंगाचं वर्णन केलेल्या या ओळी ब्रिस्बेनमध्ये वॉशिंग्टची खेळी ध्यान देऊन बघतानाना आठवत होत्या.

Australia vs India :  "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवुनिया!" तुकोबांनी पाडुंरंगाचं वर्णन केलेल्या या ओळी ब्रिस्बेनमध्ये वॉशिंग्टची खेळी ध्यान देऊन बघतानाना आठवत होत्या. नेटमधून थेट कसोटीत मिळालेल्या संधीच पोरानं सोनं करून दाखवलं. अवघा एकमेव वनडे सामना आणि टी-20 तील अनुभवाच्या जोरावर संघात आलेल्या वॉशिंग्टनने जी एकाग्रता दाखवली ती कमालीची होती. आपल्या गोलंदाजी शैलीनं चर्चेत आलेला आणि फिरकीतील जादू दाखवणारा वॉशिंग्टन बॅटिंगही बऱ्यापैकी करतो हे अनेकदा ऐकलं होतं. पण आज तो कसोटीस उतरला आणि त्याचा रिझल्टही दिसला. 

कांगारुंच्या उसळत्या चेंडूचा त्यानं नेटानं सामना केला. तुकोबांनी दुसऱ्या चरणात पांडुरंगाला पेहराव्याचे वर्णन केलंय. "तुळसी हार गळां कांसे पितांबर आवडे निरंतर तेची रुप!" कानात माशाच्या आकाराची कुंडले गळ्यात कौस्तुभ रत्न आणि कमरेभोवती पितांबर यानं सावळ्या विठ्ठलानं शृगार शोभून दिसणारा आहे, असे तुकोबा म्हणतात. अगदी तसेच ब्रिस्बेनच्या मैदानात वॉशिंग्टनने कसलेल्या कसोटीपटूसारख मैदानात उभे राहून त्यानं बॅट आणि बॉलच्या शृंगारानं आपल्या खेळीतील सौंदर्य फुलवलं. शार्दुलसोबत तो जेव्हा क्रिजमध्ये कंबरेवर हात ठेवून उभा राहायचा तेव्हा त्याने निरंतर असचं खेळत राहव, असे वाटत होतं. ब्रिस्बेनमधील त्याचं हे रुप हेची सर्व सुख... पाहावं आवडीनं असेच होते.  

कठीण परिस्थितीत 'सुंदर' रिझल्ट! गोलंदाजीनंतर वॉशिंग्टन फलंदाजीतही चमकला

भारतीय क्रिकेट चाहते झोपेतून उठायच्या आत टीम इंडियाने तिसऱ्या दिवशीच्या खेळातील तीन विकेट गमावल्या. मयांक अग्रवाल बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर मैदानात उतरला. आघाडीचे फलंदाज ज्या कांगारुंच्या माऱ्यासमोर तग धरू शकले नाहीत त्यांच्यासमोर हा नवा नवखा किती वेळ टिकणार? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण अश्विनची जागा घेणाऱ्यांनी सिडनीतील अश्विनसारखी चिवट खेळी खेळण्याची क्षमता दाखवून दिली. सिडनीत हनुमा-अश्विननं संघाला वाचवलं आणि चौथ्या आणि निर्णायक कसोटीतील तिसऱ्या दिवशी वॉशिंग्टन शार्दुलनं कसंब दाखवलं. ते कसोटीत पास झाले. वॉशिंग्टनच पदार्पण हे अविस्मरणीय ठरतं याच कारण त्याच्या नावे झालेला विक्रम. पदार्पणाच्या सामन्यात तीन विकेट्स घेऊन अर्धशतकी खेळी करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरलाय.

Aus vs Ind 4th Test Day 3 : शार्दुल-वॉशिंग्टन जोडीची 'सुंदर' खेळी

74 वर्षानंतर एखाद्या भारतीय खेळाडूनं पदार्पणात इतकी दमदार कामगिरी नोंदवली आहे. कोल्हापूरात जन्मलेल्या दत्तात्रय गजानन फडकर उर्फ दत्तू फडकर यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते. 12 डिसेंबर 1947 मध्ये सिडनीच्या मैदानात त्यांनी अष्टपैलू खेळी केली होती. 51 धावा आणि 3 विकेट घेण्याचा पराक्रम त्यांनी केला होता. त्यांच्यानंतर असा पराक्रम करणारा वॉशिंग्टन दुसरा भारतीय खेळाडू ठरलाय. 

-सुशांत जाधव

sushant.jadhav@esakal.com


​ ​

संबंधित बातम्या