बाबा स्वर्गातील सर्वात आनंदी व्यक्ती असतील; सिराजच्या खेळाला भावनेची किनार

मयुर बोरसे
Saturday, 26 December 2020

'आमच्या कुटुंबाने काहीतरी मोठं गमावलं आहे. अब्बा जान गेलेत, हे ऐकल्यावर सिराज हा अतिशय सुन्न झाला होता. आम्हालाही घरून ऑस्ट्रेलियात असलेल्या सिराजला धीर देता येत नव्हता. त्याचा आत्मविश्वास इतका खचला होता की, एका क्षणाला त्याने भारतात येण्याचेही ठरविले. मात्र, भारतीय संघातील सहकाऱ्यांनी विशेषत: कर्णधार कोहली आणि रवी शास्त्री यांनी त्याला धीर देत सावरले.

AusvsInd Boxing Day Test Mohammed Siraj :  मेलबर्न- 'माझे वडील आज स्वर्गातील सर्वांत आनंदी व्यक्ताी असतील,' अशी भावना भारताच्या कसोटी संघातील अंतिम ११मध्ये स्थान मिळालेला मध्यमगती गोलंदाज मोहम्मद सिराजच्या भावाने व्यक्त केली आहे.  सिराजने भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवावे असे वडिलांचे स्वप्न होते. मात्र, त्यांचे १ महिन्यांपूर्वीच दु:खद निधन झाले. त्यानंतर आता सिराजने कसोटीमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याचा भाऊ इस्माईलने टोली चौकी या आपल्या गावी आनंद साजरा केला. मात्र, वडिलांच्या निघून जाण्याने  या आनंदाला भावनिकतेची एक किनार होती.    
    
भारतीय संघात स्थान मिळवून आजच पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजचे वडील घौस यांचे मागील महिन्यांत १९ तारखेला निधन झाले होते. याबाबत बोलताना इस्माईल म्हणाला, 'आमच्या कुटुंबाने काहीतरी मोठं गमावलं आहे. अब्बा जान गेलेत, हे ऐकल्यावर सिराज हा अतिशय सुन्न झाला होता. आम्हालाही घरून ऑस्ट्रेलियात असलेल्या सिराजला धीर देता येत नव्हता. त्याचा आत्मविश्वास इतका खचला होता की, एका क्षणाला त्याने भारतात येण्याचेही ठरविले. मात्र, भारतीय संघातील सहकाऱ्यांनी विशेषत: कर्णधार कोहली आणि रवी शास्त्री यांनी त्याला धीर देत सावरले.  

पुढे बोलताना इस्माईल म्हणाला, 'सिराज हा भारताला नक्की अभिमान वाटेल असे काहीतरी करेल, असे ते नेहमी म्हणायचे. सिराजने जेव्हा जेव्हा भारतीय संघाचा गणवेश परिधान केला तेव्हा वडिलांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आम्ही पाहिलंय. सिराजला भारतीय संघाकडून खेळताना बघून त्यांना कमालीचे समाधान लाभत होते.  

बंजारा हिल्समधील खाजा नगरातील छोट्याश्या चाळीत राहणाऱ्या कुटुंबात राहून क्रिकेट कारकिर्द घडवणाऱ्या २६ वर्षीय सिराजबाबत आणि इस्माईल म्हणाला, 'वडील रिक्षाचालक असल्याने आमची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती. आई शबाना बेगन छोटीमोठी कामे करून वडिलांना त्यांच्या कामात हातभार लावायची. मी अभ्यासात हुशार होतो मात्र, सिराज हा फक्त क्रिकेट खेळण्यातच आपला दिवस घालवायचा. यामुळे कधी कधी आईला त्याची चिंता वाटायची. यामुळे ती त्याला मारतही असे. क्रिकेट खेळण्यामुळे याचे आयुष्यात काहीच होऊ शकणार नाही असे तिला कायमच वाटायचे. मात्र, वडिलांनी त्याला कायमच आधार दिला.  ते सिराजला अनेकदा नकळत त्याच्या खिशात पैसे टाकून त्याला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. आज तो मेलबर्न सारख्या प्रतिष्ठित मैदानावर भारतीय संघाकडून पदार्पण करतोय हे बघुन आमचे कुटुंबीय प्रचंड आनंदी आहे.  

AusvsInd Boxing Day Test : झेल होणार की झोल, अश्विनला धडकी भरवणारा क्षण

दरम्यान, मोहम्मद सिराज भारतीय संघात स्थान मिळवणारा हैदराबादचा दुसरा जलदगती गोलंदाज आहे. याआधी हैदराबादच्या सय्यद आबिद अली यांनी १९६६मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच भारतीय संघात स्थान मिळवले होते. आज मेलबर्नच्या मैदानावर पदार्पण करताना भारताचा अनुभवी फिरकीपटू रविश्चंद्रन अश्विनच्या हातून त्याला भारतीय संघाची कॅप देण्यात आली.  नाणेफेक हारल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताकडून सिराजने आज पदार्पणातच दोन बळी घेऊन आपल्या कसोटी कारकिर्दिची सुरूवात केली.


​ ​

संबंधित बातम्या