'ग्रेट अजूबा' 49 व्या वर्षी द्विशतक अन् लेकाच्या पदार्पणावेळी खेळला शेवटचा सामना

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 14 January 2021

वयाच्या 49 व्या वर्षी द्विशतक झळकावणारे इंडियन क्रिकेटमधील फिट अँण्ड हिट आजोबा तुम्हाला माहितेयत का?

क्रिकेटच्या मैदनात पहिलं वहिलं द्विशतक क्रिकेटच्या देवाची उपमा दिली जाणाऱ्या विक्रमादित्य सचिन तेंडुलकरनं लगावलं. वनडेत सर्वाधिक शतक झळकवण्याचा विक्रम हा देखील भारताच्या हिटमॅनच्या अर्थात रोहितच्या नावेच आहे. एकाच संघातील सर्वाधिक खेळाडूंनी वनडेत हा पराक्रम करण्यातही टीम इंडियाचे गडीच आघाडीवर आहेत हे देखील तुम्हाला माहित असेल पण वयाच्या 49 व्या वर्षी द्विशतक झळकावणारे इंडियन क्रिकेटमधील फिट अँण्ड हिट आजोबा तुम्हाला माहितेयत का?

भारतीय संघाला कसोटी खेळण्याचे दिवस उजाडायच्या आधी  देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणारा पुणेकर आणि प्रोफेसर डीबी देवधर असं या क्रिकेटरचं नाव. दिनकर बळवंत देवधर यांचा जन्म 14 जानेवारी 1892 मध्ये पुण्यात (पूना) झाला. टिळकांनी सुरु केलेल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या डीबी देवधर यांनी पुण्यातीलच एस पी कॉलेजमध्ये संस्कृत विषयाचे प्रॉफेसर म्हणूनही काम केले. 1911 ते 1948 दरम्यान त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली विशेष छाप सोडली. क्रिकेटच्या संस्कृतीनं  त्यांना भारतीय संघाचे प्रतिनीधत्व करण्याची संधी गमवावी लागली.  1932 मध्ये ज्यावेळी टीम इंडियाला कसोटीच सदस्य मिळवले आणि इंग्लंडला कसोटी खेळण्यासाठी टीम बांधणी झाली त्यावेळी  डीबी देवधर हे चाळीशीत होते. आता ते काय खेळणार...अशा विचाराने त्यांना टीम इंडियात स्थान मिळाले नाही. पण याच बहाद्दराने त्यानंतर 9 वर्षानंतर म्हणजे वयाच्या 49 व्या वर्षी द्विशतकाला गवसणी घालून वय हा फक्त आकडा असतो, हेच दाखवून दिले. आपल्या देशांतर्गत  कारकिर्दीत  81 सामन्यात त्यांनी  39.32 च्या सरासरीनं  4522 धावा केल्या. 1940 मध्ये वयाच्या 49 वर्षी त्यांनी 246 धावांची अविस्मरणीय खेळी केली होती.  

रणजीमध्ये महाराष्ट्राला जेतेपद मिळवून देण्याचा पराक्रम त्यांनीच करुन दाखवला. 193940 च्या रणजी हंगामापर्यंत महाराष्ट्राला स्पर्धेत एक मॅचही जिंकता आली नव्हती. मात्र या हंगामात देवधर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने रणजी ट्रॉफी जिंकली होती. 
 

वयाच्या 52 व्या वर्षी दोन्ही डावात शतकी खेळी करण्याचा पराक्रम
 

1944-45 च्या रणजी हंगामात डी.बी. देवधर यांनी क्रिकेटच्या मैदानात आणखी एक पराक्रम करुन दाखवला. नवानगर आत्ताची सौराष्टाची टीम आणि महाराष्ट्र यांच्यात झालेल्या सामन्यात मध्यम गती जलद गोलंदाज मुबारक अली यांनी महाराष्ट्राची अवस्था बिकट केली होती. 34 धावांवर 3 गडी बाद झाल्यानंतर देवधर फलंदाजीसाठी मैदानात उतरले. अवघ्या 46 धावांत अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर देवधर यांच्या भात्यातून शतकी खेळी निघाली. अवघ्या 150 मिनिटांत त्यांनी शतक साजरे केले होते.  पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी 105 धावांची खेळी केली. त्यामुळे महाराष्ट्राला पहिल्या डावात 372 धावांपर्यंत मजल मारता आली होती. दुसऱ्या डावात त्यांनी 141 धावांची खेळी केली होती. आणि महाराष्ट्राने 7 बाद 363 धावांवर डाव घोषीत केला होता. महाराष्ट्राने हा सामना 489 धावांनी जिंकला होता.  सीके नायुडू यांच्या नेतत्वाखाली पहिला कसोटी सामना खेळणारी टीम देवधऱ यांना आदर्श मानायची. वयाच्या पन्नाशीनंतरही त्यांनी कमालीचा फिटनेस दाखवून दिला. ते क्रिकेटशी इतके जोडले गेले होते की क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर क्रीडा पत्रकार म्हणूनही काम केलेय.  1946 मध्ये भारताचा इंग्लंड दौरा आणि 1947 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही ते गेले. हिंदुस्थान टाईम्सकडून ते रिपोर्टिंगला गेले असताना संघातील खेळाडूंना त्यांचे मार्गदर्शनही लाभले. 
 

टीम इंडियात स्थान मिळाले नसले तरी असा झाला सन्मान 

देशांतर्गत क्रिकेटमधील त्यांच्या योगदानामुळे 1973 पासून प्रोफेसर डीबी देवधर ट्रॉफी सुरु करण्यात आली. देशातील लोकप्रिय स्पर्धेपैकी ही एक आहे. 2015-16 पर्यंत या स्पर्धेत पाच झोनच्या टीम  50 षटकांचे सामने खेळायच्या. बीसीसीआयने यात आता बदल करुन तीन टीम मर्यादित केल्या आहेत. विजय हजारे स्पर्धेतील विजेत्या संघाशिवाय   इंडिया ए आणि इंडिया बी 5 दिवसीय स्पर्धा खेळवण्यात येते. 

भारतीय क्रिकेटमधील आजोबांसदर्भातील काही खास गोष्टी 

# देवधर यांनी खेळाडूपासून ते प्रशासकापर्यंत काम केले.  बीसीसीआयचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि बीसीसीआय निवड समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. 

# 1965 मध्ये देवधर यांना पद्मश्री आणि 1991 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. 

# शंभर वर्षांहून अधिक आयुष्यमान लाभलेल्या मोजक्या क्रिकेटमध्ये देवधर यांचा समावेश होतो. 1993 मध्ये  101 वर्षांचे असताना त्यांचे निधन झाले. 

# त्यांच्या तिन्ह मुली तारा, सुंदर आणि सुमन देवधर यांनी राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटनमध्ये हात आजमावले आहेत.  

# 1996 मध्ये डीबी देवधर यांचे क्रिकेटमधील योगदान लक्षात घेऊन टपाल तिकिटावरही त्यांना स्थान मिळाले. सीके नायुडू, वीनू मंकड आणि विजय मर्चेंट यांचाही यात समावेश आहे. पुणे क्रिकेट स्टेडियममध्ये आजही देवधर यांची मूर्ती पहायला मिळते. 

# 1947 मध्ये डीबी देवधर वयाच्या 55 व्या वर्षी विनू मंकड यांच्या नेतृत्वाखालील शेष भारत (रेस्ट ऑफ इंडिया) संघाविरुद्ध शेवटचा सामना खेळले. विशेष म्हणजे याच सामन्यात ज्यूनियर देवधर अर्थात शरद देवधर यांनी महाराष्ट्राकडून पदार्पणाचा सामना खेळला. ज्या सामन्यात मुलाने पदार्पण केले तो सामना डीबी देवधर यांच्यासाठी शेवटचा होता. असा कमालीचा योगायोग क्रिकेटच्या मैदानावर यापूर्वी घडलेला नाही आणि पुढेही असे चित्र कदाचित पाहायला मिळणार नाही.


​ ​

संबंधित बातम्या