'विराट' ओझं लिलया पेलणारा सेनापती!

सुशांत जाधव
Tuesday, 29 December 2020

आक्रमक कांगारुंना थोपवण्याचा पराक्रम अजिंक्य सारख्या संयमी आणि कार्यवाहू कर्णधाराला जमला कसा?   जी टीम 36 धावांत ऑल आउट झाली त्याच टीमला अल्पावधीच्या कालावधीत नेमका कसला बूस्ट मिळाला? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात निश्चितच पडले असतील.

Ajinkya Rahane Captancy in Australia : गुलाबी आँखे... बघून एखाद्याच ह्रदय शराबी होण्याचं वैगेर वर्णन तुम्ही बॉलिवूडच्या गाण्यातून ऐकलंच असेल. ऑस्ट्रेलियात गुलाबीचा नाद लई वंगाळ असल्याची अनुभूती आली. गुलाबी चेंडूवरील टीम इंडियाचा खेळ काँटा रुते कुणाला अन् वेदना होते क्रिकेट चाहत्यांना अशीच काहीशी होती. रात्र वैऱ्याची असते पण टीम इंडियाचा कांगारुंनी दिवसाच काटा काढला आणि डे नाईट सामन्यात आम्ही दिवसाढवळ्या लाजिरवाण्या पराभवाला सामोरे गेलो. 2020 मध्ये खूप वाईट अनुभव येतात त्यातलाच हा एक धक्कादायक प्रकार. पण मेलबर्नमध्ये बॉल बदलला आणि गेमही. 

क्रिकेटच्या मैदानात उतरल्यावर  रक्त उसळते म्हणणारा विराट लाल चेंडूवर खेळताना नव्हता. पहिला पराभव आणि सध्याच्या घडीला क्रिकेटच्या मैदानातील 'बाप माणूस' नसताना अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर खूप मोठे ओझे होते. मेलबर्नच्या मैदानात नाणेफेक गमावल्यानंतर त्यात आणखी भर पडली. पण संयमी स्वभावाच्या अजिंक्यनं आक्रमक क्रिकेट रणनितीचा वापर करुन कांगारुंना भानावर आणलं. टीम इंडिया सहज हार माणणारी नाही. हे त्यानं दाखवून दिलं. अजिंक्य रहाणे माझ्या नजरेतील असा एकमेव  खेळाडू आहे जो कसोटी संघाचा उपकर्णधार असतानाही बाकावर बसलाय. याचा त्याला संकोच झाला असं वक्तव्य त्याने कधीच केलं नाही. हा त्याच्या स्वभावाचा मोठेपणा. 

पिंक बॉल विसरा; अजिंक्यच्या शिलेदारांनी कांगारुंना दिला 'रेड अलर्ट'

आता आक्रमक कांगारुंना थोपवण्याचा पराक्रम अजिंक्य सारख्या संयमी आणि कार्यवाहू कर्णधाराला जमला कसा?   जी टीम 36 धावांत ऑल आउट झाली त्याच टीमला अल्पावधीच्या कालावधीत नेमका कसला बूस्ट मिळाला? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात निश्चितच पडले असतील. याचा सर्व श्रेय जाते ते अजिंक्यच्या कर्तृत्ववान नेतृत्वाला. त्याने ज्यापद्धतीने बॉलिंग, फिल्डिंग सेट करुन कांगारुंना अडचणीत आणले ते अप्रतिम होते. गोलंदाजांचा वापर त्याने ज्या पद्धतीने केला ते पाहता तो कार्यवाहू कर्णधार नाही तर नियमित कर्णधाराची पात्रता सिद्ध करतोय, असेच वाटत होते. संयमी स्वभावाच्या कार्यवाहू कर्णधाराने आक्रमक नेतृत्व करत प्रतिस्पर्ध्याला दबावात टाकले. विराटची आक्रमकता ही चेहऱ्यावरील हावभाव आणि बॅटिंगमध्ये निश्चितच असते. पण रणनितीमध्ये रहाणेच्या रणनितीची आक्रमकता विराटपेक्षा वरचढ होती.  

AusvsInd : घरच्या मैदानात कांगारुंवर पहिल्यांदाच ओढावली अशी नामुष्की

फिल्डिंगवेळी नेतृत्वाची झलक दाखवून दिल्यावर ज्यावेळी बॅटिंगची वेळ आली तेव्हा रहाणेनं फलंदाजीतील आपलं कसब दाखवून पणाला लागलेली मालिका बरोबरीत नेणारी खेळी केली. पहिल्या कसोटी सामन्यातील उणीव भरुन काढण्यासाठी त्याची शतकी खेळी उपयुक्त ठरली. सेनापती कसा असावा हे त्याने या खेळीतून दाखवून दिलं. ऑस्ट्रेलियात टीम इंडियाने फार मोठे तीर मारलेले नाहीत. कांगारुंविरोधात मालिका अनिर्णित ठेवणं हे देखील एक मोठ टास्क असतं. अजिंक्यनं ती जिंकून दाखवली.  

सामनावीराच्या स्वरुपात त्याला मानाचं Mullagh Medal मिळालं. ते कौतुकास्पद आहेच. पण त्यापेक्षा मोठी गोष्ट जर त्याने मिळवली असेल तर ती म्हणजे विराट कोहलीनंतर  त्याने बिशन सिंग बेदी, लिटल मास्टर सुनिल गावस्कर, अनिल कुंबळे, सौरव गांगुली या दिग्गज कर्णधारांच्या यादीत मिळवलेलं स्थान. मालिका जिंकली तर यात भर पडेल आणि नव्या वर्षांच ते सर्व क्रिडा प्रेमींसाठी मोठ गिफ्टच ठरेल.   


​ ​

संबंधित बातम्या