टीम इंडियाचा ‘पुणे ते पुणे’चा अनोखा प्रवास विराटच्या खास मुलाखतीतून!

सुनंदन लेले
Sunday, 13 October 2019

गेल्या पावणेदोन वर्षांत विराट कोहलीच्या संघानं दमदार पावलं टाकत आयसीसी क्रमवारीत अव्वल क्रमांक गाठला आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर भारतीय संघ परत एकदा पुण्यात कसोटी सामना खेळत असल्यानं पुणे ते पुणेचा अनोखा प्रवास कसा होता, यावर विराट कोहली दिलखुलास बोलला.

पावणेदोन वर्षांपूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना पुण्यात होणार होता. भारतीय संघाकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. झालं भलतंच! बीसीसीआयच्या क्युरेटरनं लुडबूड करून खेळपट्टीचा स्वभाव बदलायची घोडचूक केली. त्याचा मोठा फायदा ऑस्ट्रेलियन संघानं घेतला आणि अवघ्या अडीच दिवसांत भारतीय संघाचा ३३३ धावांनी भलामोठा पराभव केला. त्या पराभवानं भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत सातव्या क्रमांकावर फेकला गेला.

अडीच दिवसांत सामना संपला असल्यानं खेळाडूंना दोन दिवस विश्रांतीकरता घरी पाठवायचं का पुण्यातच थांबवायचं, याबद्दल प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात विचारविनिमय सुरू झाला. दोघांनी मिळून असं ठरवलं, की पराभवाचं दु:ख मनात घेऊन घरी जाण्यापेक्षा संघ एकजुटीचा काहीतरी कार्यक्रम करावा. मग संपूर्ण भारतीय संघ मुळशीला ‘गरुड माची’ या अनोख्या रिसॉर्टला गेला. जाताना कोणीही क्रिकेटचं साहित्य बरोबर नेलं नाही. ‘गरुड माची’ला खेळाडूंनी रात्रीच्या अंधारात हाती टॉर्च आणि दिशादर्शक यंत्र घेत ट्रेझर हंटमध्ये भाग घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण खेळाडूंना शेजारच्या मोठ्या डोंगरावर घेऊन गेला. एकदम ताजीतवानी होऊन भारतीय टीम बंगळूरला रवाना झाली. संघानं बंगळूरचा आणि शेवटचा धरमशालाचा कसोटी सामना जिंकून मालिका २-१ जिंकली.

आज त्या प्रसंगाची आठवण आली आणि मी विराट कोहलीला बोलायची विनंती केली. कारण साधं होतं. गेल्या पावणेदोन वर्षांत विराट कोहलीच्या संघानं दमदार पावलं टाकत आयसीसी क्रमवारीत अव्वल क्रमांक गाठला आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर भारतीय संघ परत एकदा पुण्यात कसोटी सामना खेळत असल्यानं पुणे ते पुणेचा अनोखा प्रवास कसा होता, यावर विराट कोहली दिलखुलास बोलला.

भारतीय संघानं अडीच दिवसांत कसोटी सामना गमावला होता, तो दिवस आठवतो मला; पण दुसऱ्या दिवशी आपण भेटलो, तेव्हा तू ताठ मानेनं समोर आला होतास... आणि विचारल्यावर म्हणाला होतास : ‘‘सर मॅच हारें है...जिंदगी नहीं.’’ जिंकल्यावर माज करायचा नाही आणि पराभवानंतर खचायचं नाही, या मागचा विचार काय आहे? : बहोत जरुरी चीज है वो. खेळ म्हटल्यावर हार - जीत होणारच. अगदी काहीही केलं तरी. तुम्ही संघ म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले असले, तर पराभवानंतर उगाच निराशेचं वातावरण ठेवून वावरणं योग्य नसतं. चुका सगळ्यांकडून होतात. आम्ही चुका मान्य करतो. त्यातून शिकतो आणि पुढं जायचा प्रयत्न करतो. पराभवानंतर निराश व्हायला होतं; पण त्याची नकारात्मकता रेंगाळता कामा नये. संघाला भरपूर क्रिकेट सामने खेळायचे असतात, याचा विचार करता विचारांत, वागणुकीत समतोल राखणं आवश्यक असतं. मागच्या सामन्यात काय चुका केल्या, त्यातून काय शिकलो आणि सुधारणा केल्या याचा विचार करतो आम्ही. जिंकल्यावर हवेत पाय जाऊ न देणं हे याकरता महत्त्वाचं आहे- कारण नाहीतर अतिउत्साहाच्या भरात गोष्टी गृहीत धरण्याची चूक होऊ शकते. तेव्हा संघ व्यवस्थापन किंवा कर्णधार म्हणून सातत्यानं सुधारणा करत चांगलं क्रिकेट खेळण्यावर लक्ष ठेवलं जातं.

सन २०१७ मध्ये त्याच ऑस्ट्रेलियासमोरच्या मालिकेत कुलदीप यादव संघात आला होता. अजूनही काही तरुण खेळाडू टप्प्याटप्प्यानं संघात दाखल झाले आणि स्थिरावले. याला भारतीय संघाच्या ड्रेसिंगरूमचं वातावरण किती कारणीभूत होतं? : संघात नवे तरुण खेळाडू सामावून घेताना सर्वांत मोठी जबाबदारी संघातल्या ज्येष्ठ किंवा अनुभवी खेळाडूंना बाळगावी लागते. संघात ११पैकी ११ खेळाडू अनुभवी असतील, असं होत नाही. संघातल्या अनुभवी खेळाडूंनी ‘नव्या खेळाडूंना फुलायला आम्ही वेळ देऊ आणि त्या दरम्यान कामगिरीची जबाबदारी आम्ही घेऊ,’ असा भरवसा दिला, तर मग संघाची प्रगती होत राहते. मी भारतीय संघात आलो, तेव्हा संघातल्या अनुभवी खेळाडूंनी मला हा विश्वास दिला, की तू उगाच भारतीय संघात आलेला नाहीत. चांगला खेळाडू आहेस म्हणूनच आला आहेस. मला त्यांनी माझ्या शैलीत क्रिकेट खेळायला प्रोत्साहन दिलं. वेळ दिला. आता तीच गोष्ट आम्ही करतो आहोत. भारतीय क्रिकेटची प्रगती सतत होण्याकरता ही प्रक्रिया सुरू राहायला हवी.

संघ यश-अपयशाच्या कालखंडातून जातो, तसाच खेळाडूही जात असतो. खराब काळ कोणाला चुकलेला नाही. महत्त्वाची बाब म्हणजे ज्याला चांगला खेळ जमत असतो, तो सर्वोत्तम कामगिरी करायला पाऊल पुढं टाकतो.
: अर्थातच ते करता यायला पाहिजे. तुम्ही खेळाडू म्हणून संघाकरता काय करू शकता, एवढा एकच विचार आम्ही करत असतो. लहानपणापासून प्रत्येकाची ध्येयं असतात. भारतीय संघाकरता खेळणं प्रत्येकाचं ध्येय असतं. मग ते पूर्ण झालं, की प्रवास संपत नाही. उलट सुरू होतो. फलंदाज असाल, तर शतक ठोकलं, की काम झालं असं होत नाही. कोणीही कितीही कामगिरी केली, तरी आमचं मूल्यमापन ‘तो क्या हुआ’ यावर विसंबून असतं. तुमच्या कामगिरीनं संघाला काय फायदा झाला, चांगला खेळ केला असेल; पण संघ जिंकला का हाच प्रश्न सतत विचारला जातो. याच कारणामुळं भारतीय संघानं गेल्या दोन वर्षांत परदेशांत किती कसोटी सामने जिंकले आणि पाहुण्या संघानं भारताच्या दौऱ्या‍वर आल्यावर किती कसोटी सामने जिंकले, ते तपासून बघा. एक गोष्ट नक्की आहे : पराभवानंतर सबब सांगत बसत नाही... आम्ही उत्तरं शोधतो!

आत्ताचंच उदाहरण बघा. गेल्या कसोटी सामन्यात मयांक शतक करून थांबला नाही- त्यानं द्विशतक केलं. रोहितनं पहिल्या डावातल्या शतकावर समाधान मानलं नाही. त्यानं दुसऱ्या डावातही भन्नाट फलंदाजी केली. अजिंक्य विहारीनं दडपणाखाली वेस्ट इंडिजमध्ये सुंदर फलंदाजी केली. हे करत असताना विचार एकच होता : संघ कसा जिंकेल.

खासकरून गेल्या दोन वर्षांत तंदुरुस्तीबाबत आलेली जागरूकता कमाल वाटते आहे. सांगण्यापेक्षा किंवा धाक दाखवण्यापेक्षा संघातल्या खेळाडूंना तंदुरुस्तीचं महत्त्व आपणहून पटलं आहे, हा बदल किती मोठा आहे? कारण फलंदाजीच नाही, तर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात झालेला बदल लक्षणीय आहे.

गेल्या दोन वर्षांत संघात खेळणाऱ्या‍ किंवा नव्यानं दाखल होणाऱ्या सगळ्यांना संघ कोणत्या मार्गावर चालत आहे याची सुस्पष्ट जाणीव आहे. सातव्या क्रमांकावरून आम्ही कसोटी मानांकनात अव्वल स्थानी झेप घेतली आहे, त्याला कारण कार्यपद्धती आहे. मधल्या काळात कोणीही वैयक्तिक कामगिरीवर लक्ष न देता फक्त संघाचा विचार केला आहे. मी किती सामने खेळीन किंवा माझ्या किती धावा होतील, किती विकेटस् मिळतील...काहीही नाही! सगळ्यांनी लक्ष फक्त कार्यप्रणालीवर ठेवून संघाचा विचार केला आहे. संघ सर्वोत्तम क्रिकेट सातत्यानं खेळला, तरच सगळ्यांचा फायदा आहे, हे सगळ्यांना मनोमन समजलं आहे. याच कारणामुळं आम्ही जगभर सगळ्या संघांना जाऊन भिडतो...नडतो. संघ विजयी झाल्यावर मिळणारा आनंद हीच सगळ्यांची नशा आहे. तंदुरुस्ती राखणं हा त्याचाच एक अविभाज्य भाग बनला आहे. एक लक्षात घ्या, की भारतीय उपखंडात गुणवत्तेची कमतरता कधीच नव्हती. प्रश्न होता सर्वोच्च तंदुरुस्तीचा. काही गोष्टी जन्मत: येतात, हे मान्य आहे; पण उरलेल्या बऱ्याच गोष्टी मेहनतीनं कमावता येतात हे सगळ्यांना पटलं आहे. माझं साधं सरळ म्हणणं आहे, की तुम्हाला सर्वोत्तम फिल्ड बनवण्याची नशा नसेल, तर खेळण्यात काहीच मजा नाही. आता सगळ्यांना कळून चुकलं आहे, की आपले वेगवान गोलंदाज जगात सर्वोत्तम होऊ शकतात. जगातला सर्वोत्तम फिल्डिंग करणारा संघ आम्ही होऊ शकतो. विचारात बदल झाल्यामुळं या तंदुरुस्तीनं आम्ही जगातल्या कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो.

सन २०१७ मध्ये पुण्यातून एका प्रवासाला सुरुवात झाली, ज्याचा शेवट पुण्यातल्या कसोटीनं होईल; पण नंतर येणारी दोन वर्षंही मजेदार असणार आहेत. भारतात खेळताना आम्हाला कोणी पराभूत करू शकत नाही, या विचारांना एक जबरदस्त झटका २०१७च्या पुण्यातल्या कसोटी सामन्यानं आम्हाला दिला. एक स्पीड ब्रेकर होता तो आमच्या प्रवासातला. त्यातून आम्ही बरंच काही शिकलो. पराभवानंतर किंवा खराब काळात एकजूट कशी राखली पाहिजे, याचा विचार करून पराभवातून खच्ची न होता आम्ही उभारी घेतली. नंतर आम्ही वेगळ्या प्रकारे संघाला एकत्र आणलं. मग बंगळूर कसोटीत विजय मिळवला; पण त्या सामन्यात मानसिकदृष्ट्या आम्ही अगदी थकून गेलो. इतकी त्या सामन्यात एकाग्रता होती सगळ्यांची. नंतरचा रांचीचा सामना अनिर्णित राहिला; पण शेवटचा धरमशालाचा सामना आम्ही जिंकलो. त्यानंतरचा प्रवास तुम्हीपण जवळून बघितला आहे.

होय येणाऱ्या दोन वर्षांचा काळ म्हणजेच आयसीसी टेस्ट चँपियनशिपचा काळ मजेदार राहणार आहे. सन २०१७ मध्ये एका काळ्या फलकावर आम्ही संघाच्या प्रवासाची रूपरेषा आखली होती. पुण्यात परत कसोटी सामन्याकरता आलो असताना मला त्याचा आनंद मिळतो आहे, की आम्ही ठरवलेल्या मार्गावरून प्रवास केला. प्रत्येक कसोटी सामन्यात आम्ही एकाग्रता प्रक्रियेवर ठेवली. येत्या दोन वर्षांत नेमकं तेच करायचं आहे- बाकी काही नाही. संघाचा विचार करून सातत्यानं सुधारणेचा ध्यास ठेवायचा आहे.


​ ​

संबंधित बातम्या