ICC Test WC : पाकची धुलाई केली तरी भारताची बरोबरी करणं इंग्लंडला जमणार नाही

टीम ई-सकाळ
Wednesday, 29 July 2020

वेस्ट इंडीजवर 2 - 1 ने विजय मिळविल्यामुळे इंग्लंडने आता आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर झेप घेतली आहे.

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात इंग्लंडने विंडीज संघाचा तब्बल 269 धावांनी पराभव  करत मालिका खिशात घातली आहे. वेस्ट इंडीजवर 2 - 1 ने विजय मिळविल्यामुळे इंग्लंडने आता आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंड संघाला या मालिकेत 80 गुण मिळाले आहेत. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

कोरोनाच्या संकटातून सावरत 8 जुलै रोजी इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली होती. ही कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी इंग्लंडचा संघ आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रमवारीत 146 अंकांसह चौथ्या स्थानावर होता. मात्र या कसोटी मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना जिंकल्यामुळे इंग्लंडला 80 अंक मिळाले आहेत. तर याच मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यामुळे वेस्ट इंडीजचा संघ 40 गुणांसह टेबलमध्ये सातव्या स्थानावर कायम आहे. चॅम्पियनशिपची प्रत्येक मालिका 120 गुणांची असते, ज्या मालिकेतील सामन्यांच्या संख्येवर समान प्रमाणात वितरीत केल्या जातात.  

`वदे भारत'द्वारे परदेशी कुस्ती कोच भारतात    

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत भारतीय संघ 360 गुणांसह अव्वलस्थानी आहे. तर 296 गुणांसह ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या नंबरवर विराजमान आहे. विंडीजविरुद्धच्या विजयानंतर इंग्लंडच्या खात्यात 80 गुण जमा झाले असून त्यांनी गुणतालिकेत न्यूझीलंडची जागा घेतली आहे. विंडीजनंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तानसोबत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पाकिस्तानच्या संघाला त्यांनी व्हाइटवॉश केले तरी त्यांच्या खात्यात 120 गुण जमा होतील. आणि त्यांना ऑस्ट्रेलियाच्या (296) पुढे जाण्यास याची मदत होईल. पण भारतीय संघाचे अव्वलस्थान कायमच राहिल. वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील बादशाहत कायम ठेवण्याच्या इराद्यानेच भारतीय संघ मैदानात उतरेल.

दरम्यान, स्टुअर्ट ब्रॉडची अष्टपैलू खेळी अन् कर्णधार जो रुटच्या नाबाद (68) अर्धशकासह बर्न्स (90) आणि सिब्लेनं (56) दुसऱ्या डावात केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर यजमान इंग्लंडने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात पाहुण्या विंडीज समोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या विंडीजचा संघ वोक्स अन् ब्रॉड यांच्या माऱ्यासमोर पुन्हा गडबडला. चौथ्या दिवसाचा खेळ पावसाने वाया घालवल्यानंतर पाचव्या दिवशीही मँचेस्टरच्या मैदानात पावसाच्या सरी इंग्लडच्या मालिका विजयात अडथळा ठरतील, अशी परिस्थिती निर्माण झाली. पण विंडीजला चौथ्या दिवशीप्रमाणे पाचव्या आणि अखेरच्या दिवशी पावसाने साथ दिली नाही. इंग्लंड गोलंदाजांनी पाहुण्यांना 129 धावांत आटोपत मालिका 2-1 अशी खिशात घातली. ब्रॉडने पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात विंडीजच्या 4 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या यजमान इंग्लंडने विंडीजला तब्बल 269 धावांनी पराभूत करत 32 वर्षानंतर इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याचे स्वप्न उद्धवस्त केले. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप गुणतालिका
      

संघ P W L T  D N/R  PT
भारत 9 7 2 0 0 0 360
ऑस्ट्रेलिया 10 7 2 0 1 0 296
इंग्लंड 12 7 4 0 1 0 226
न्यूझीलंड 7 3 4 0 0 0 180
पाकिस्तान 5 2 2 0 1 0 140
श्रीलंका 4 1 2 0 1 0 80
वेस्ट इंडीज 5 1 4 0 0 0 40
दक्षिण अफ्रीका 7 1 6 0 0 0 24
बांगलादेश 3 0 3 0 0 0 0

 


​ ​

संबंधित बातम्या