ENGvsWI 3rd Test :स्टुअर्ट ब्रॉडच्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंड मजबूत स्थितीत  

टीम ई-सकाळ
Monday, 27 July 2020

तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने दिलेल्या 389 धावांचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिज संघाने 2 फलंदाज गमावत 10 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.  

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात, पहिल्या डावात 369 धावा केल्यानंतर इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या धारदार गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात 197 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडच्या संघाने 2 गड्यांच्या मोबदल्यात 226 धावांवर आपला डाव घोषित करत, 389 धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजला दिले. मात्र तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने दिलेल्या 389 धावांचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिज संघाने 2 फलंदाज गमावत 10 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.           

तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यामध्ये नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे  पहिल्या पहिल्या फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंड संघाने सलामीवीर रोरी बर्न्स, ओली पोप, जोस बटलर व स्टुअर्ट ब्रॉडच्या धमाकेदार खेळीमुळे 369 धावा उभारल्या. त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाला स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या धारदार गोलंदाजीमुळे 197 धावांवर रोखण्यात इंग्लंडला यश आले. त्यामुळे पहिल्याच डावात इंग्लंडने वेस्ट इंडिजवर 172 धावांची आघाडी मिळवली. 

श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूकडून सौरव गांगुलीचे तोंडभर कौतूक

स्टुअर्ट ब्रॉडने वेस्ट इंडिज संघाच्या क्रॅग ब्रेथवेटला अवघ्या एका धावेवर तंबूत धाडले. त्यानंतर जॉन कॅम्पेबलने मैदानात तग धरण्याचा प्रयत्न केला. पण जोफ्रा आर्चरने बर्न्सकरवी त्याला झेल बाद करत इंग्लंडला दुसरे यश मिळवून दिले. यानंतर शाय होप 17,  ब्रुक्स 4 यांना जेम्स अँडरसनने स्वस्तात माघारी पाठवले. तर ब्लॅकवूडची 26 वोक्स ने विकेट घेतल्यामुळे विंडीजचा संघ अडचणीत सापडला. यानंतर आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 6 गड्याच्या मोबदल्यात 137 धावांच्या पुढे खेळताना रोस्टन चेस, जेसन होल्डर, कॉर्नवेल यांना पायचीत व डाउरिचला वोक्सकडे झेलबाद करत स्टुअर्ट ब्रॉडने पहिल्याच डावात 6 विकेट मिळवल्या. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडने सलामीवीर रोरी बर्न्स 90, डॉम सीब्ले 56 आणि कर्णधार जो रूट 68 यांच्या अर्धशतकी खेळीने 226 धावा करत, आपला डाव घोषित केला. त्यामुळे इंग्लंडने सामन्याच्या विजयासाठी वेस्ट इंडिज संघाला 389 धावांचे लक्ष्य दिले. मात्र 389 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाला स्टुअर्ट ब्रॉडने पुन्हा जोरदार धक्का देत, सलामीवीर जॉन कॅम्पेबलला शून्यावर आणि केमर रोचला झेलबाद केले. त्यामुळे तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिज संघाने 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा केल्या आहेत.                 

त्यामुळे स्टुअर्ट ब्रॉडने आत्तापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीमध्ये या सामन्यात दमदार  कामगिरी केली असून, पहिल्या डावात त्याने 62 धावांची खेळी करत वेगवान अर्धशतक झळकावले. तर पहिल्याच डावात मारक गोलंदाजी करत 6 विकेट आणि दुसऱ्या डावात आत्तापर्यंत 2 विकेट मिळवल्या आहेत.  

आता 'या' देशांचे खेळाडूही आयपीएलच्या सुरुवातीस मुकणार? 

दरम्यान, कोरोनाच्या संकटातून सावरत इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर, साउथहॅम्प्टनच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाला नमवत पाहुण्या विंडीज संघाने तर मँचेस्टर येथील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता. त्यामुळे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिज संघाशी 1 - 1 ने बरोबरी साधली आहे. 

 


​ ​

संबंधित बातम्या