ENGvsWI 3rd Test : ब्रॉडचं धमाकेदार अर्धशतक; आघाडीच्या गड्यांमुळे विंडीज अडचणीत

सुशांत जाधव
Saturday, 25 July 2020

इंग्लंडच्या धावसंख्येची बरोबरी करण्यासाठी विंडीजला आणखी 232 धावांची आवश्यकता आहे.

मँचेस्टर : इंग्लंडच्या संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्या डावात 369 धावा केल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी भेदक माऱ्यासमोर विंडीजच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विंडीजने 6 गड्याच्या मोबदल्यात 137 धावा धाव फलकावर लावल्या होत्या. इंग्लंडच्या धावसंख्येची बरोबरी करण्यासाठी विंडीजला आणखी 232 धावांची आवश्यकता आहे. फलंदाजीत धमाकेदार खेळी करणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने विंडीजला पहिला धक्का दिला. त्याने क्रॅग ब्रेथवेटला अवघ्या एका धावेवर तंबूत धाडले. जॉन कॅम्पेबलने मैदानात तग धरण्याचा प्रयत्न केला. पण जोफ्रा आर्चरने बर्न्सकरवी त्याला झेल बाद करत इंग्लंडला दुसरे यश मिळवून दिले.

'पॉप'च्या खेळीनंतर सचिन आठवणीत रमला!

कॅम्बबेलने 32 धावांचे योगदान दिले. विंडीजच्या डावातील ही सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली. शाय होप 17,  ब्रुक्स 4, रोस्टन चेस 9, ब्लॅकवूड 26 हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्याने विंडीजचा संघ अडचणीत सापडला आहे. कर्णधार जेसन होल्डर 24 आणि शेन डोवरिच 10 धावांवर खेळत असून पराभव टाळायचा असेल तर या जोडीला मोठी भागीदारी करावी लागेल. तत्पूर्वी पहिल्या दिवशी 4 बाद 258 धावांवरुन आली पोप (91) आणि जोस बटलर (56)ने इंग्लंडच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली.   डावाला सुरुवात केली. पण गॅब्रियलने ओली पोपला एकही धाव जमा न करता तंबूत धाडले. अवघ्या 9 धावांनी त्याचे कारकिर्दीतील दुसरे शतक हुकले.

ENGvsWI 3rd Test :पोप शतकाच्या उंबरठ्यावर; पहिल्या दिवसाअखेर यजमान मजबूत स्थितीत

आपल्या वैयक्तिक धावसंख्येसह संघाच्या धावसंख्येत 11 धावांची भर घालून बटलरही 67 धावा करुन माघारी फिरला. गॅब्रियलने होल्डरकरवी त्याला झेलबाद केले. क्रिस ओक्स 1, जोफ्रा आर्चर 3 धावा करुन माघारी फिरल्यानंतर स्टुअर्ड ब्रोडने अर्धशतकी खेळी करत विंडीजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने 45 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 62 धावा केल्या. अँड्रसनने संघाच्या धावसंख्येत 11 धावांची भर घातली. डॉम बेस 18 धावांवर नाबाद राहिला. स्टुअर्ट ब्रोडच्या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 369 धावा केल्या.  
 


​ ​

संबंधित बातम्या