पराभवानंतर कोहलीने चाहत्यांना दिले 'हे' वचन

वृत्तसंस्था
Monday, 13 August 2018

लॉर्डसवर रविवारी (12 ऑगस्ट) भारतीय संघाला चौथ्या दिवसअखेरीस एक डाव आणि 159 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. कोहलीला स्वत:ला दुसऱ्या कसोटीत धावा करण्यात अपयश आले आणि त्याने भारतीय फलंदाजांनी क्षमतेप्रमाणे कामगिरी न केल्याचेही कबुल केले.

लंडन : लॉर्डसवर रविवारी (12 ऑगस्ट) भारतीय संघाला चौथ्या दिवसअखेरीस एक डाव आणि 159 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. कोहलीला स्वत:ला दुसऱ्या कसोटीत धावा करण्यात अपयश आले आणि त्याने भारतीय फलंदाजांनी क्षमतेप्रमाणे कामगिरी न केल्याचेही कबुल केले.

कोहलीने सामन्यानंतर बोलताना म्हणाला, "लोकांच्या मते आम्ही खराब परिस्थितीत फलंदाजी केली, पण आम्ही त्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित केले तर आम्हाला योजना आखणे शक्य होणार नाही. या सामन्यात काय घडले याचा विचार करण्यापेक्षा आम्हाला आता आमच्या चुका दुरुस्त कराव्या लागतील. आमच्याकडे त्याशिवाय दुसरा पर्याय नाही.''

"एका खेळाडूसाठी त्याने केलेल्या चुका दुरुस्त करणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि एक संघ म्हणून आम्ही यावर लक्ष केंद्रित करू. खरे पाहता आम्ही या सामन्यात चांगला खेळ केला नाही. फलंदाज अपयशी झाले. गोलंदाजांनी चांगली सुरुवात करुन दिली मात्र त्यांना सातत्याने अचूक मारा करण्यात अपयश आले. आम्ही दोन्ही क्षेत्रांत चांगली कामगिरी करु शकलो असतो.'' असे मत त्याने व्यक्त केले. 

 

दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळाडूंना चुका केल्या हे कोहलीने मान्य केले आणि त्याच्या सहकाऱ्यांनीही त्यांच्या चुका मान्य कराव्यात अशी त्याची अपेक्षा आहे. तो म्हणाला, ''आम्हाला आमच्या चुका मान्य करायला हव्यात, त्यातून धडा घेऊन पुन्हा त्याच चुका केल्या जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.  सध्यातरी कसोटी मालिका 2-1 करण्याकडे आमचे लक्ष्य आहे. आमच्या गोलदाजांमध्ये 20 बळी मिळवण्याची क्षमता आहे आणि फलंदाज म्हणून आम्ही जास्तीत जास्त धावा करणे अपेक्षिक आहे. मात्र आम्हाला या दोन्हींचा समोतल राखण्यात अपयश आले.''

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 18 ऑगस्टला नॉटिंगहम येथे होणार आहे.

संबंधित बातम्या