#INDvsENG सॅम करनने दिले भारताला तीन धक्के

सुनंदन लेले
Thursday, 2 August 2018

डाव्या हाताने गोलंदाजी करताना वेगापेक्षा स्वींगवर भर देणार्‍या सॅम करनने पहिल्यांना मुरली विजयला चूक करायला भाग पाडले. पंचांनी नाबाद ठरवले असताना ज्यो रूटने तिसर्‍या पंचांकडे दाद मागितली आणि विजय पायचित असल्याचा निर्णय अलीम दर यांना बदलून द्यावा लागला. लगे सॅम करनने लोकेश राहुलला बोल्ड केले. पुढ्यात पडलेल्या चेंडूला राहुलने बॅटने स्टंपवर ओढले. तिसरा धक्का जास्त मोठा होता कारण जम बसलेला शिखर धवन स्टंपात टप्पा पडून बाहेर स्वींग होणार्‍या चांगल्या चेंडूवर झेलबाद झाला. नाबाद ५० वरून भारताचा धावफलक ३ बाद ५९ची अवस्था दाखवू लागला.

एजबस्टन : सॅम करनला मोहंमद शमीने बाद केल्यावर इंग्लंडचा डाव २८७ धावांमधे गुंडाळला गेला. ब्रॉड - अँडरसन जोडीला समर्थपणे सामोरे जाताना भारताची सुरुवात चांगली झाली.  शिखर धवन आणि मुरली विजय या सलामीवीरांनी दिलेल्या अर्धशतकी भागीदारीचा आनंद सॅम करनने हिरावून घेतला. दोनही ओपनर्स सोबत लोकेश राहुलला तंबूचा रस्ता दाखवताना सॅम करनने सुंदर स्वींग गोलंदाजीचे दर्शन घडवले. दुसर्‍या दिवशी उपहाराला खेळ थांबला तेव्हा भारताचे तीन प्रमुख फलंदाज बाद झाले आहेत आणि ७६ धावा जमा झाल्या आहेत. विराट कोहली - अजिंक्य रहाणेची कप्तान उप कप्तानाची जोडी मैदानावर टिकून आहे.

दुसर्‍या दिवशीचा खेळ चालू झाल्यावर शेवटचा फलंदाज बाद करायला शमीने वेळ घालवला नाही. पहिल्या दिवशी खंबीरपणे खेळपट्टीवर उभ्या राहणार्‍या सॅम करनला शमीने बाद केले आणि इंग्लंडचा डाव २८७ धावांवर संपला.

भारतीय डावाच्या सुरुवातीला ब्रॉड अँडरसन या गोलंदाजांच्या जोडीला भारताचे सलामीचे फलंदाज कसे तोंड देतात ही उत्सुकता एजबास्टन मैदानावरील प्रेक्षकांना होती. शिखर धवन आणि मुरली विजयने उजव्या यष्टीबाहेर जाणार्‍या चेंडूंचा बरोबर अंदाज घेतला. खराब चेंडूंवर धावा काढायला ते कमी पडले नाहीत. बघता बघता भागीदारीचे अर्धशतक पार पडले. वाटले होते मस्त पाया रचून दिला आहे सलामीच्या जोडीने आता मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली जाऊ शकते. 

तिसरा वेगवान गोलंदाज सॅम करनच्या डोक्यात त्यावेळी वेगळे विचार चालू होते. डाव्या हाताने गोलंदाजी करताना वेगापेक्षा स्वींगवर भर देणार्‍या सॅम करनने पहिल्यांना मुरली विजयला चूक करायला भाग पाडले. पंचांनी नाबाद ठरवले असताना ज्यो रूटने तिसर्‍या पंचांकडे दाद मागितली आणि विजय पायचित असल्याचा निर्णय अलीम दर यांना बदलून द्यावा लागला. लगे सॅम करनने लोकेश राहुलला बोल्ड केले. पुढ्यात पडलेल्या चेंडूला राहुलने बॅटने स्टंपवर ओढले. तिसरा धक्का जास्त मोठा होता कारण जम बसलेला शिखर धवन स्टंपात टप्पा पडून बाहेर स्वींग होणार्‍या चांगल्या चेंडूवर झेलबाद झाला. नाबाद ५० वरून भारताचा धावफलक ३ बाद ५९ची अवस्था दाखवू लागला.

एव्हाना जीमी अँडरसन गोलंदाजी करून थोडा थकला होता. पण विराट कोहली फलंदाजीला आलेला बघून त्याने अजून तीन षटके गोलंदाजी केली. कोहलीला सतत उजव्या स्टंप बाहेर स्वींग होणारा मारा करून अँडरसनने त्याचा संयम तपासला. उपहाराकरता खेळ थांबला तेव्हा मैदानात उभी असलेली अजिंक्य रहाणे - विराट कोहलीची जोडी भारतीय संघाकरता आशेचा भाग होता.

संबंधित बातम्या