विराट दक्षिण आफ्रिकेसारखी खेळी करणार इंग्लंडमध्ये

वृत्तसंस्था
Wednesday, 29 August 2018

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने पिछाडीवर असल्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नवे डावपेच आखण्याच्या तयारीत आहे. 

साउदम्पटन : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने पिछाडीवर असल्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नवे डावपेच आखण्याच्या तयारीत आहे. 

गुरुवारपासून (ता. 30) सुरु होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात खेळपट्टीवर गवत ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. जास्त गवत असलेल्या खेळपट्टीवर भारतीय संघ अद्याप इंग्लंडमध्ये खेळलेला नाही. त्यामुळे आता भारतीय संघाला या आव्हानाला सामोरे जावे लागले आहे. इंग्लंडही भारताला अडचणीत आणणार हे निश्चित आहे. अशावेळी विराटने संघात फिरकी गोलंदाजाला न खेळविता वेगवान माराच उतरविण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. भारतीय संघाकडे अशी वेगवान गोलंदाजी आहे, जी कोणत्याही संघाला बाद करू शकते. त्याच्याच फायदा उठविण्याच्या तयारीत विराट आहे.

याच वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या जोहान्सबर्ग कसोटीत विराटने हीच रणनीती वापरली होती. या कसोटीत भारतीय संघाला विजय मिळाला होता. त्यामुळे अश्विन किंवा जडेजा या दोघांनाही संघात स्थान मिळणार नसल्याची शक्यता आहे. भारतीय संघात महंमद शमी, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा आणि उमेश यादव या वेगवान गोलंदाजांचे आक्रमण आहे. यांच्या जोडीला हार्दिक पंड्या हा अष्टपैलू खेळाडू असणार आहे. भारतीय संघाला मालिकेत बरोबरी करण्यासाठी धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे.


​ ​

संबंधित बातम्या