IND vs ENG: विराटच्या नावे खास विक्रम, कॅप्टन कूल धोनी अजूनही उजवाच

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 28 March 2021

विराट कोहली आपल्या खास सामन्यात टॉस आणि बॅटिंगमध्ये अपयशी ठरला.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात विराटच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली. 200 सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व करणारा कोहली तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. क्रिकेट जगतातील सर्वात यशस्वी कर्णधार एम एस धोनी यात सर्वात आघाडीवर आहे. तर मोहम्मद अझरुद्दीननेही 200 + सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. 

विराट कोहली आपल्या खास सामन्यात टॉस आणि बॅटिंगमध्ये अपयशी ठरला. नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर तो मैदानात उतरला. निर्णायक सामन्यात कोहलीकडून दमदार खेळीची अपेक्षा होती. पण मोईन अलीने त्याला फार काळ मैदानात तग धरु दिला नाही. अवघ्या 7 धावांर मोईन अलीने त्याला बोल्ड केले. तत्पूर्वी इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील 12 व्या सामन्यात दहाव्यांदा त्याने टॉस गमावला.  

INDvsENG : 'छापा-काटा'च्या खेळात 'विराट' पराभवाचा 'सिलसिला', पण...

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 127 सामने जिंकले आहेत. भारतीय संघाला सर्वाधिक विजय मिळवून देण्याचा विक्रम धोनीच्या नावे आहे. त्याने  332 आंतरराष्ट्रीय सामन्यातील 178 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे. यात आयसीसीच्या सर्व ट्रॉफींचा समावेश आहे.  अझरुद्दीनने 221 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. यात 104 सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवला आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्याच्या वनडे मालिकेत इंग्लंडच्या संघाने पिछाडीवरुन बरोबरी साधली होती. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर इंग्लंडने दुसरा सामना जिंकला. कसोटी आणि टी-20 तील पराभवाचा बदला घेऊन शेवट गोड करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे भारतीय संघ विजयी मालिका कायम ठेवून विश्वविजेत्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी प्रयत्नशील असेल.
 


​ ​

संबंधित बातम्या