Ind vs Eng: भरमैदानात विराट संतापला; वाचा नक्की काय घडला प्रकार

सकाळ स्पोर्ट्स
Monday, 15 March 2021

भारतीय संघाने दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवला. या सामन्यात भारत क्षेत्ररक्षण करत असताना विराटचं रौद्र रूप दिसून आलं.

अहमदाबाद (Ind vs Eng 2nd T20): मोटेरा मैदानावर झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने इंग्लंडवर ७ गडी राखून विजय मिळवला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत १६४ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यात जेसन रॉयच्या ४६ धावांची खेळी महत्त्वाची ठरली. १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पदार्पणाचा सामना खेळणारा इशान किशन याने अर्धशतक झळकावलं. तो बाद झाल्यावर कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७३ धावांची खेळी करून संघाला दिमाखात विजय मिळवून दिला. या सामन्यात फिल्डिंग करताना विराट कोहलीचा आक्रमक अंदाज पुन्हा एकदा दिसून आला.

भारताचा कर्णधार विराट कोहली हा मैदानावर खेळताना आक्रमक असतो ते साऱ्यांनाच माहिती आहे. सामन्याच्या नवव्या षटकात विराट आणि पंच यांच्यात झालेल्या वादानंतर विराटचं रौद्र रूप चाहत्यांना पाहायला मिळालं. नवव्या षटकात युझवेंद्र चहल गोलंदाजी करत असताना जेसन रॉयने चेंडू मारायचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटला लागला नाही. चेंडू क्रीजच्या रेषेबाहेर असल्याने पंचांनी तो चेंडू वाईड दिला. पण जेसन रॉय ऑफ साइडला हलला असल्याने चेंडू वाईड असून शकत नाही असं म्हणत विराट पंचांवर चिडला. विराटने पंचांशी हुज्जत घातली पण पंचांचाच निर्णय अंतिम असल्याने विराटला ते मानावंच लागलं.

हे नक्की वाचा-  Ind vs Eng Video: एक झेल सोडला तर एक पकडला; सूर्यकुमारची तारेवरची कसरत

विराटने पंचांवर असलेला राग पुढच्या षटकात स्टंपवर काढला. हार्दिकच्या गोलंदाजीवर बेअरस्टोने चेंडू टोलवला. त्यावेळी विराट धावत स्टंपच्या जवळ आला. फिल्डरने चेंडू अडवून विराटकडे दिला. बेअरस्टो क्रीजच्या आत असूनही विराटने चेंडू स्टंपवर जोरात आदळला. विराटने रागाच्या भरात केलेल्या त्या कृतीमुळे चेंडू स्टंपला लागून दूर गेला आणि इंग्लंडच्या संघाला एक अतिरिक्त धाव मिळाली.

क्रिकेटबद्दलच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

दरम्यान, विराटने फलंदाजी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ४९ चेंडूत विराटने नाबाद ७३ धावा केल्या. त्याने खेळी ५ चौकार आणि ३ षटकारांनी सजवली.


​ ​

संबंधित बातम्या