Video: हार्दिकचा अजब-गजब शॉट पाहून सारेच झाले अवाक

सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 13 March 2021

बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर खेळताना हार्दिकने आधी षटकार तर पुढच्याच चेंडूवर चौकार लगावला.

भारतीय संघाने कसोटी मालिकेत इंग्लंडवर ३-१ अशी मात केली. या मालिकेत विजय मिळवून भारताने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. त्यानंतर शुक्रवारी सुरू झालेल्या टी२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात मात्र भारताला पराभवाचा धक्का बसला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत १२४ धावांपर्यंतच मजल मारली. अहमदाबादच्या मैदानावर रोहित शर्माने कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करूनही त्याला कालच्या सामन्यात संधी देण्यात आली नाही. याचा फटका भारतील फलंदाजीला बसला. श्रेयस अय्यर वगळता इतर सर्व फलंदाजांनी चाहत्यांची निराशा केली. हार्दिक पांड्याला चांगली सुरूवात मिळाली होती, पण त्याला मोठी खेळी उभारता आली नाही. तसे असले तरी हार्दिकच्या अजब-गजब फटक्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.

श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या ही जोडी १५व्या षटकात मैदानावर होती. बेन स्टोक्स गोलंदाजीसाठी आला. पहिल्या तीन चेंडूवर श्रेयस अय्यरला केवळ १ धाव घेता आली होती. त्यानंतर चौथ्या चेंडूवर हार्दिकने दमदार षटकार लगावला. त्यामुळे चिडलेल्या बेन स्टोक्सने हार्दिकला उसळता चेंडू टाकला. पण हार्दिकने तो चेंडू हुशारीने टोलवला. हार्दिकच्या हेल्मेटच्या जवळ चेंडू अतिशय वेगाने आला. त्यावेळी हार्दिकने अतिशय अजब-गजब पद्धतीने चेंडूला दिशा दिली. फटका मारताना हार्दिक त्याच्याच जागेवर पडला. पण त्याने टोलवलेला चेंडू दिमाखात सीमारेषेपार पोहोचला. त्याच्या या फटक्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. अनेकांनी या फटक्याचं नाव हार्दिक पांड्या शॉट आहे का असंही ट्विटरवर विचारल्याचं दिसून आलं.

Brought to you by

दरम्यान, सामन्यात भारतीय संघाचे वरच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले.लोकेश राहुल (१), विराट कोहली (०), शिखर धवन (४), ऋषभ पंत (२१) आणि हार्दिक पांड्याने (१९) काही काळ फटकेबाजी केली पण त्यांना फारशी चमक दाखवता आली नाही. त्यानंतर श्रेयस अय्यरने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. त्याने ८ चौकार आणि १ षटकार खेचत ४८ चेंडूत ६७ धावा केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने १२४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जेसन रॉयने ४९ धावा केल्या. जोस बटलरला सामन्यात सूर गवसला होता पण तो २८ धावांवर बाद झाला. त्यानंतर डावखुरा डेव्हिड मलान (२४) आणि फटकेबाज जॉनी बेअरस्टो (२६) या दोघांनी नाबाद राहत इंग्लंडच्या संघाला विजय मिळवून दिला आणि संघाला १-०ने मालिकेत आघाडी मिळवून दिली.


​ ​

संबंधित बातम्या