INDvsENG : टीम इंडियाचा सुरुय कसून सराव; BCCI नं शेअर केला व्हिडिओ

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 3 February 2021

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी दोन्ही संघासाठी ही मालिका महत्त्वपूर्ण आहे.

भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यासाठी चेन्नईचे चेपॉक स्टेडियम सज्ज झाले आहे. दोन्ही संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईच्या मैदानात रंगणार आहेत. 5 फेब्रुवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार असून पहिला कसोटी सामना हा प्रेक्षकांविना रंगणार आहे. कोरोनाच्या पार्शभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्दची मालिका स्थगित करण्याची वेळ आली होती. त्यानंतर चेन्नईतील कसोटी सामन्याने भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट अनलॉक होत आहे. 

दोन्ही संघातील खेळाडूंनी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केल्यानंतर सरावाला सुरुवात केली आहे. बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंच्या सरावाची एक झलक आपल्या अधिकृत अकाउंटवरुन शेअर केली आहे.  कर्णधार विराट कोहली, उप कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्यासह रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह ही मंडळी नेटमध्ये कसून सराव करत असल्याचे या व्हिडिओमधून दिसून येते. 

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी दोन्ही संघासाठी ही मालिका महत्त्वपूर्ण आहे. भारतीय संघ सध्याच्या घडीला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमावरीत अव्वलस्थानी असला तरी या मालिकेतील कामगिरीवर त्यांचा फायनल प्रवेश अवलंबून असणार आहे. भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत दोन कसोटी सामने जिंकावे लागतील. 

दुसरीकडे इंग्लडसमोरही मोठे आव्हानच आहे. त्यांनाही आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळण्याची शेवटची संधी आहे. पण त्यांना घरच्या मैदानावर खेळणाऱ्या भारतीय संघाला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागले. इंग्लंचा संघ श्रीलंकेला व्हाईट वॉश करुन भारत दौऱ्याला रवाना झालाय. तर भारतीय संघाने प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियात मालिका विजयाचा पराक्रम केलाय. त्यामुळे दोन्ही संघातील लढत ही रंगतदार होण्याची अपेक्षा आहे.


​ ​

संबंधित बातम्या