Ind vs Eng: 'कॅप्टन' कोहली नावाप्रमाणेच विराट; केला धोनीलाही न जमलेला विक्रम

सकाळ स्पोर्ट्स
Monday, 15 March 2021

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर भारताने दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवला.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचं नाबाद अर्धशतक (७३) आणि पदार्पणाचा टी२० सामना खेळणाऱ्या इशान किशनची ५६ धावांची खेळी यांच्या बळावर भारताने दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवला. भारताने या विजयासह ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने १६४ धावांपर्यंत मजल मारली. जेसन रॉयने ४६ धावांची खेळी करत महत्त्वाची भूमिका बजावली. या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना पदार्पणाचा सामना खेळणारा इशान किशन याने अर्धशतक झळकावलं. तो बाद झाल्यावर कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७३ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात विराटने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असा एक विक्रम करून दाखवला.

विराट मैदानावर फलंदाजीसाठी उतरला तेव्हा कर्णधार म्हणून विराटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११ हजार ९८३ धावा होत्या. इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात तो जेव्हा १७ धावांवर पोहोचला तेव्हा कोहलीने नावाप्रमाणेच एक विराट विक्रम आपल्या नावे केला. भारतीय कर्णधार म्हणून १२ हजार धावांचा टप्पा गाठणार विराट पहिला भारतीय कर्णधार ठरला. या आधी भारताकडून कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीने सर्वाधिक ११ हजार २०७ धावा केल्या होत्या. पण विराटने त्याचा विक्रम मोडत एक नवा विक्रम प्रस्थापित केला. क्रिकेट जगतात १२ हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा विराट हा रिकी पॉन्टींग (१५,४४०) आणि ग्रॅम स्मिथ (१४,८७८) यांच्यानंतर केवळ तिसरा कर्णधार ठरला.

Ind vs Eng: भरमैदानात विराट संतापला; वाचा नक्की काय घडला प्रकार

इशान किशननेदेखील पदार्पणाच्या सामन्यात एक पराक्रम केला. पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक ठोकणारा इशान किशन केवळ दुसरा भारतीय फलंदाज ठरला. इशान किशनने ५ चौकार आणि ४ षटकार ठोकत आपलं अर्धशतक झळकावलं. याआधी केवळ मुंबईकर अजिंक्य रहाणेने ही किमया साधली होती. २०११ मध्ये अजिंक्य रहाणेने पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावलं होतं. त्याने पदार्पणाच्या सामन्यात ६० धावा केल्या होत्या. त्यानंतर असा पराक्रम करणारा इशान दुसराच भारतीय ठरला.


​ ​

संबंधित बातम्या