Ind vs Eng: इशानची 'विराट' खेळी; भारताने काढला पराभवाचा वचपा

सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 14 March 2021

पहिल्या सामन्यात पराभवाचा दणका बसलेल्या भारताने दुसऱ्या टी२०मध्ये इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिलं. शिस्तबद्ध गोलंदाजी आणि त्यानंतर विराट कोहली, इशान किशनचा तडाखा यांच्या जोरावर भारताने सामना जिंकला.

अहमदाबाद: गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या प्रतिकाराचे चीज विराट कोहलीने इशान किशनच्या साथीत केले आणि इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० लढतीत भारतास ७ विकेट आणि १३ चेंडू राखत विजयी केले. विराट कोहलीच्या षटकाराने विजयी लक्ष्य गाठत भारताने मालिकेत बरोबरी साधली. पाचच गोलंदाज घेऊन खेळण्याचा धोका भारताने पत्करला होता. कदाचित त्यामुळे भारताच्या प्रत्येक गोलंदाजाने आपली जबाबदारी चांगली पार पाडली. त्यामुळे भारताने इंग्लंडला पावणेदोनशेच्या आत रोखण्यात यश मिळवले. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केलेल्या इशान किशनने पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय लढतीत सलग दोन षटकार मारत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या फटकेबाजीने भारताच्या विजयाचा पाया रचला. इशान किशनने बाद झाल्यावर परतताना मैदानात येणाऱ्या रिषभ पंतला चेस्ट बंप केले. रिषभने इशानप्रमाणेच फटकेबाजी सुरू ठेवली. तो परतला त्या वेळी आवश्‍यक धावगती षटकास सहापेक्षा कमी झाली होती.

विराट कोहलीने आक्रमण आणि बचाव याचा संगम साधत एक बाजू लावून धरली होती, त्यामुळे भारतीय फलंदाजी सुरू झाल्यावर काही षटकांनी दिसू लागलेला विजय प्रत्येक षटकागणिक अधिक स्पष्ट होत गेला. त्याने ९ षटकांत इशान किशनसह ९४ आणि रिषभ पंतसह ३.४ षटकात ३४ आणि श्रेयस अय्यरसह ४.१ षटकात ४१ धावा जोडत भारतास एकतर्फी विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, शार्दुल ठाकूरने गतीत हुशारीने बदल करीत इंग्लंड फलंदाजांची लय बिघडवली. त्यामुळे दोनशेच्या नजीक इंग्लंड मजल मारेल अशी अपेक्षा असताना त्यांना पावणेदोनशेपासूनही दूर राहावे लागले. जॅसन रॉय, जॉन बेअरस्टॉ आणि इऑन मॉर्गन यांना जम बसला असताना ते पूर्ण हुकुमत गाजवणार नाहीत याची काळजी भारतीय गोलंदाजांनी विशेषतः शार्दुल ठाकूरने घेतली. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी धावगतीस चांगली खीळ घातली.

संक्षिप्त धावफलक:-

इंग्लंड- 6 बाद 164 (जॅसन रॉय 46- 35 चेंडूत 4 चौकार व 3 षटकार, डेव्हिड मालन 24- 23 चेंडूत 4 चौकार, जॉन बेअरस्टॉ 20, इऑन मॉर्गन 28- 20 चेंडूत 4 चौकार, बेन स्टोक्‍स 24, अवांतर 16 - 5 वाईडसह, भुवनेश्वर कुमार 4-0-28-1, वॉशिंग्टन सुंदर 4-0-29-2, शार्दूल ठाकूर 4-0-29-2, हार्दिक पंड्या 4-0-33-0, युजवेंद्र चहल 4-0-34-1)

भारत- 17.5 षटकांत 3 बाद 166 (केएल राहुल 0, इशान किशन 56- 32 चेंडूत 5 चौकार व 4 षटकार, विराट कोहली नाबाद 73- 49 चेंडूत 5 चौकार व 3 षटकार, रिषभ पंत 26- 13 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार, श्रेयस अय्यर नाबाद 8, सॅम करन 4-1-22-1, जोफ्रा आर्चर 4-0-24-0,ख्रिस जॉर्डन 2.5-0-38-1, अदिल रशीद 4-0-38-1)

सामनावीर- इशान किशन


​ ​

संबंधित बातम्या