दोष खेळपट्टीचा नव्हे, फलंदाजांचा; जाणून घ्या कोण काय म्हणाले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 February 2021

चेंडू फिरकी घेत असतो, त्या वेळी त्याच्या टप्प्यापर्यंत जाणे आवश्‍यक असते. केवळ इंग्लंडचेच नव्हे, तर भारताचे फलंदाजही क्रिजच्या बाहेर येण्यास तयार नव्हते. त्यांनी चेंडूला करामत दाखवण्याची संधी दिली.

अहमदाबाद : भारतातील अनेक माजी कसोटीपटू फलंदाजांच्या अपयशासाठी अहमदाबाद येथील खेळपट्टीस जबाबदार धरत आहेत. त्याच वेळी सुनील गावसकर यांनी दोष खेळपट्टीचा नसून फलंदाजांच्या अतिबचावात्मक मनोवृत्तीचा असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे, तर बहुतेक फलंदाज सरळ चेंडूवर बाद झाले, असेही ते म्हणाले.

तिसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या बाद झालेल्या वीसपैकी 19 फलंदाज फिरकी गोलंदाजांनी बाद केले. त्यात अक्षर पटेलने 11; तर रविचंद्रन अश्विनने 7 फलंदाज बाद केले. ‘फलंदाज चेंडूला कसे सामोरे जातात, हे महत्त्वाचे असते. याच खेळपट्टीवर क्रॉली आणि रोहितने अर्धशतक केले. इंग्लंडचे फलंदाज धावा कशा करायच्या, याऐवजी विकेट कशी राखायची, याचा विचार करीत होते. फिरकीचा सामना करताना क्रिझचा योग्य वापर महत्त्वाचा असतो. चेंडू वेगाने उसळणाऱ्या खेळपट्टीवर त्याचा सामना करण्याचे धैर्य महत्त्वाचे असते. या खेळपट्टीवर धावा करणारे खरे फलंदाज असतात,’’ असे गावसकर यांनी नमूद केले. 

INDvsENG विराट BCCI ची वकिली करतोय का? कूकचा संतप्त सवाल

चेंडू फिरकी घेत असतो, त्या वेळी त्याच्या टप्प्यापर्यंत जाणे आवश्‍यक असते. केवळ इंग्लंडचेच नव्हे, तर भारताचे फलंदाजही क्रिजच्या बाहेर येण्यास तयार नव्हते. त्यांनी चेंडूला करामत दाखवण्याची संधी दिली. फलंदाज क्रिज सोडून पुढे आला, तर त्याला पायचीतचा निर्णय देताना पंच दहा वेळा विचार करतील. फलंदाजांची मानसिकताच बचावात्मक होती, असे गावसकर यांनी सुनावले. 

कसोटीसाठी योग्य खेळपट्टी नव्हती. इंग्लंडने पहिल्या डावात दोनशे धावा केल्या असत्या, तर भारतासमोरील आव्हान अवघड झाले असते; मात्र खेळपट्टी दोन्ही संघांसाठी एकच असते.
- हरभजन सिंग

याच प्रकारे खेळपट्ट्या तयार होणार असतील, तर प्रत्येक कसोटीत दोनऐवजी तीन डाव असायला हवेत.
- मायकेल वॉन, इंग्लंडचे माजी कर्णधार

दोन दिवसांत निकाल लागणे, कसोटी क्रिकेटसाठी कितपत चांगले आहे. या प्रकारच्या खेळपट्टीवर अनिल कुंबळेने एक हजार आणि हरभजनने ८०० विकेट घेतल्या असत्या. 
- युवराज सिंग

यासारख्या एखाद्या खेळपट्टीवर फलंदाजांच्या कौशल्याचा पूर्ण कस लागणे समजू शकते; या कसोटीत दोन्ही संघांनी खराब फलंदाजी केली. खेळपट्टी खराब नव्हती, फलंदाजी वाईट होती. 
- केविन पीटरसन

कसोटीसाठी खेळपट्टी योग्य नव्हती. भारताचा पहिला डावही १४५ धावात संपला होता. 
- व्हीव्हीएस लक्ष्मण


​ ​

संबंधित बातम्या