पंतचा इश्कवाला रिस्की शॉट; तोही जोफ्राला (VIDEO)

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 12 March 2021

भारतीय डावातील पाचव्या षटकातील जोफ्राच्या चौथ्या चेंडूवर पंतने रिव्हर्स फ्लिपच्या फटक्यावर सहा धावा मिळवल्या. 

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघातील आघाडीच्या फलंदाजांनी निराशजनक कामगिरी केली. केएल राहुल बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. दोन विकेट लवकर पडल्यानंतर रिषभ पंतला बढती देण्यात आली. आपल्या आक्रमक शैलीत पंतनेही इंग्लिश गोलंदाजांचा समाचार घेतला. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर त्याने पुन्हा एकदा अजब-गजब शॉट खेळल्याचे पाहायला मिळाले. कसोटी सामन्यात जो शॉट त्याने अँड्रसनविरुद्ध खेळला होता अगदी तसाच फटका त्याने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर खेळल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या या शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  

भारतीय डावातील पाचव्या षटकातील जोफ्राच्या चौथ्या चेंडूवर पंतने रिव्हर्स फ्लिपच्या फटक्यावर सहा धावा मिळवल्या. दुसऱ्या चेंडूवर खणखणीत चौकारही खेचल्याचे पाहायला मिळाले. पंत आपल्या धमाकेदार खेळीने भारतीय संघाचा डावाला आकार देईल असे वाटत असताना अष्टपैलू बेन स्टोक्सने पंतला बाद केले. पंतने 23 चेंडूत 21 धावा केल्या. यात त्याने 2 चौकार आणि एक षटकार खेचला. 

इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय़ घेतला. त्याने पहिल्या षटकात चेंडू फिरकीपटू आदिल राशीदच्या हाती सोपवला. जोफ्राने दुसऱ्या षटकात लोकेश राहुलला बाद केले. त्यानंतर आदिल राशिदने कोहलीला खातेही उघडू दिले नाही. श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळीनं संघाचा डाव सावरला. हार्दिक सोबत त्याने अर्धशतकी भागीदारीही केली. त्यामुळे भारतीय संघाला निर्धारित 20 षटकात 124 धावांपर्यंत मजल मारता आली.
 


​ ​

संबंधित बातम्या