"ओय, बॅट दिखा"; इशान किशनने सांगितला विराटबद्दलचा मजेशीर किस्सा

सकाळ स्पोर्ट्स
Monday, 15 March 2021

टीम इंडियाचा युवा फलंदाज इशान किशन याने पदार्पणाच्या सामन्यात अवघ्या ३२ चेंडूत केलेली ५६ धावांची खेळी केली.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने झळकावलेलं नाबाद अर्धशतक (७३) आणि पदार्पणाच्या सामन्यात इशान किशनने अवघ्या ३२ चेंडूत केलेली ५६ धावांची खेळी यांच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवला. भारताने या विजयासह ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत बरोबरी साधली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने १६४ धावा केल्या होत्या. त्यात जेसन रॉयच्या ४६ धावांचा मोठा वाटा होता. आव्हानाचा पाठलाग करताना इशान किशनने दमदार सुरूवात केली. त्याने अर्धशतक झळकावल्यानंतरचा विराटबद्दलचा किस्सा त्याने चाहत्यांसोबत सामन्यानंतर शेअर केला.

युझवेंद्र चहलने बीसीसीआय टीव्हीसाठी इशान किशनची मुलाखत घेतली. या मुलाखतीत चहलने, तू अर्धशतक झाल्यानंतर लगेच बॅट का उंचावली नाहीस?, असा प्रश्न विचारला. त्यावर इशानने धमाल उत्तर दिले. "मी जेव्हा फटका मारला तेव्हा मला स्वत:ला खात्री नव्हती की माझं अर्धशतक झालं आहे. विराटने समोरून मला 'टॉप इनिंग्स' असं म्हटलं तेव्हाही मला पटकन समजलं नाही. सहसा मी अर्धशतकानंतर बॅट उंचावत नाही. पण विराट मागून ओरडला, 'ओय बॅट दाखव. चहुबाजुंना बॅट फिरवून अर्धशतक साजरं कर. सगळ्यांना बॅट दाखव. तुझा पहिला आंतरराष्ट्रीय सामना आहे'. मग मात्र मी बॅट उंचावून दाखवली आणि अर्धशतक साजरं केलं असं इशानने सांगितलं.

इशान किशनचा पदार्पणाच्या सामन्यातच विक्रम- इशान किशननेदेखील पदार्पणाच्या सामन्यात एक पराक्रम केला. पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक ठोकणारा इशान किशन केवळ दुसरा भारतीय फलंदाज ठरला. इशान किशनने ५ चौकार आणि ४ षटकार ठोकत आपलं अर्धशतक झळकावलं. याआधी केवळ मुंबईकर अजिंक्य रहाणेने ही किमया साधली होती. २०११ मध्ये अजिंक्य रहाणेने पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावलं होतं. त्याने पदार्पणाच्या सामन्यात ६० धावा केल्या होत्या. त्यानंतर असा पराक्रम करणारा इशान दुसराच भारतीय ठरला.

हे नक्की वाचा- Ind vs Eng: भरमैदानात विराट संतापला; वाचा नक्की काय घडला प्रकार

विराटने केला भारतीयांना अभिमान वाटावा असा विक्रम- विराट कोहली मैदानावर फलंदाजीसाठी उतरला तेव्हा कर्णधार म्हणून विराटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११ हजार ९८३ धावा होत्या. इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात तो जेव्हा १७ धावांवर पोहोचला तेव्हा कोहलीने एक विक्रम केला. भारतीय कर्णधार म्हणून १२ हजार धावांचा टप्पा गाठणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला. याआधी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीने सर्वाधिक ११ हजार २०७ धावा केल्या होत्या. पण विराटने त्याचा विक्रम मोडीत काढला.


​ ​

संबंधित बातम्या