सामनावीर पुरस्कार स्वीकारताना ईशान किशन भावूक, खास व्यक्तीला समर्पीत केला पुरस्कार

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 15 March 2021

सामनावीर पुरस्कार स्वीकारताना ईशान किशन भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

भारतीय संघानं दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर सात गड्यांनी विजय मिळवत हिशेब चुकता केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पदार्पणवीर ईशान किशन यानं विस्फोटक फलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या सामन्यात पदार्पण करणारा इशान किशन हा विजयाचा शिल्पकार ठरला. किशन यानं अवघ्या ३२ चेंडूत ५६ धावांनी विस्फोटक फलंदाजी केली.  या अफलातून खेळीसाठी पदार्पणवीर ईशान किशन याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. सामनावीर पुरस्कार स्वीकारताना ईशान किशन भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. किशन यानं आपला सामनावीर पुरस्कार खास व्यक्तीला समर्पीत केला आहे. 

सामनावीर पुरस्कार स्वीकारताना  ईशान किशन भावूक झाला होता. पुरस्कार स्विकारताना तो म्हणाला, "मी या खेळीचे श्रेय माझ्या वरिष्ठ खेळाडूंना देऊ इच्छितो, ज्यांनी मला मैदानात जाऊन स्वाभाविक खेळ खेळण्यास सांगितले. एका बलाढ्य संघासमोर टी-२० पदार्पण करणे नक्की सोपे नसते. मुंबई इंडियन्स संघाकडून देखील मला चालना मिळाली आहे."

पुढे बोलताना किशन म्हणाला की,  "मी अखेरपर्यंत फलंदाजी करायला हवी होती, या गोष्टीचं मनापासून वाईट वाटतेय. टॉम करनच्या चेंडूवर लगावलेला तो षटकार माझ्यासाठी अविस्मरणीय होता. इथंपर्यंत पोहचण्यासाठी मला मदत करणाऱ्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. प्रशिक्षक, वरिष्ठ खेळाडू आणि प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार. काही दिवसांपूर्वी माझ्या प्रशिक्षकांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांनीदेखील मला हेच सांगितले होते की, तुला मैदानावर जावं लागेल आणि धावा कराव्या लागतील. यामुळे हा पुरस्कार मी माझ्या प्रशिक्षकाच्या वडिलांना समर्पित करत आहे." 

 

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात  १६४ धावा केल्या. यात सलामीवीर जेसन रॉयच्या सर्वाधिक ४६ धावांचा समावेश होता. ३५ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकार मारत त्याने ही धावसंख्या केली होती. भारताकडून गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्यात. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघानं विराट कोहली आणि पदार्पणवीर ईशान किशन यांच्या अर्धशतकाच्या बळावर १७.५ षटकातच सात गडी राखून हे आव्हान पार केलं.   कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली.  त्याच्याबरोबर ईशान किशननेही ३२ चेंडूत ५६ धावांनी अफलातून खेळी केली. 


​ ​

संबंधित बातम्या