INDvsENG 1st T20 : रिषभ पंतची निवड होणार? संघ निवडताना तारेवरची कसरत 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 March 2021

राहुल सलामीबरोबर यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळत असल्यामुळे रिषभ पंतला अनेक सामन्यात राखीव खेळाडूत रहावे लागलेले आहे, परंतु अगोदर ऑस्ट्रेलिया आणि आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने केलेल्या मॅचविनर खेळींमुळे त्याने ट्‌वेन्टी-20 मधील आपले स्थान हक्काने मिळवले आहे.

अहमदाबाद : काही महिन्यांनंतर मायदेशात होत असलेल्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी संघ रचनेचा विचार करून भारतीय संघ  इंग्लंडविरुद्धच्या क्रिकेट ट्‌वेन्टी-20 मालिकेस सामोरे जात आहे, पण ताकदवर असल्यामुळे संघ निवड करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नोव्हेंबर महिन्यात भारतात होणारी ट्‌वेन्टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धा तशी दूर असली तरी संघ निवडीसाठी पर्याय उपलब्ध असण्याकरिता इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेसाठी नवोदितांची संघात निवड करण्यात आली आहे, परंतु नवे-जुने अशी सांगड घालताना प्रामुख्याने फलंदाजीत अंतिम संघात कोणाला स्थान द्यायचे, हे कोडे संघ व्यवस्थापनास सोडवावे लागणार आहे.

रिषभ पंतची निवड होणार?

राहुल सलामीबरोबर यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळत असल्यामुळे रिषभ पंतला अनेक सामन्यात राखीव खेळाडूत रहावे लागलेले आहे, परंतु अगोदर ऑस्ट्रेलिया आणि आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने केलेल्या मॅचविनर खेळींमुळे त्याने ट्‌वेन्टी-20 मधील आपले स्थान हक्काने मिळवले आहे. त्यामुळे त्याची निवड अपेक्षित आहे. रोहित-शिखर-राहुल-विराट-पंत, त्यानंतर हार्दिक पंड्या अशी फलंदाजीची क्रमवारीस असल्यास श्रेयस अय्यरला संघाबाहेर रहाण्याची शक्‍यता आहे. तसेच सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना पदार्पणासाठी वाट पहावी लागेल.

Road Safety World Series : इंग्लंड दिग्गजांची दक्षिण आफ्रिकनं लिजेंड्सनीं काढली हवा

लक्ष्य इंग्लंड

 पहिली ट्‌वेंटी 20
ठिकाण : नरेंद्र मोदी स्टेडियम, मोटेरा अहमदाबाद
थेट प्रक्षेपण : संध्याकाळी ७ पासून स्टार स्पोर्टस्‌
हवामानाचा अंदाज : सामन्याच्या वेळी अपेक्षित तपमान 32 अंश, काहीसे ढगाळ हवामान, पण पावसाची शक्‍यताही नाही. अपेक्षित आर्द्रता 14 टक्के
खेळपट्टीचा अंदाज : प्रामुख्याने फलंदाजीला साथ देणार, पण फिरकीचा प्रभाव अपेक्षित. दवाची शक्‍यता असल्याने धावांचा पाठलाग उपयुक्त ठरण्याची शक्‍यता.

भुवनेश्‍वरवर नव्या चेंडूची मदार

गोलंदाजीत संधी देताना भारतासामोर मोजके पर्याय असण्याची शक्‍यता आहे. नवोदित वरुण चक्रवर्ती आणि नटराजन तंदुरुस्त नसल्याचे सांगितले जात आहे, पण भुवनेश्‍वर कुमारच्या पुनरागमनामुळे अनुभवी गोलंदाज असेल, त्याच्या साथीला दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर तसेच नवदीप सैनी यांच्यात चुरस असेल. फिरकी गोलंदाजीत युझवेंद्र चहलचे स्थान पक्के असून वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यापैकी एकाला संधी मिळू शकेल.

नव्याने रणनीती आखावी लागणार
कर्णधारापासून इंग्लंडचा संघ बदलला आहे. जॉस बटलर, बेन स्टोक्‍स आणि जोफ्रा आर्चर तसेच जॉनी बेअरस्टॉ यांचा अपवाद वगळता इतर खेळाडू बदललेले आहेत, त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाला नव्याने रणनीती आखावी लागणार आहे. वरील चार प्रमुख खेळाडूंसह ऑइन मॉर्गन, मोईन अली यांच्याकडे आयपीएलचा अनुभव आहे, त्यामुळे भारतीय संघाला सावध रहावे लागणार आहे.

धावांचा पाऊस?

नरेंद्र मोदी स्टेडियमवरच ही पाच सामन्यांची ट्‌वेन्टी-20 मालिका होणार आहे. कसोटी सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्ट्या फिरकीस साथ देणाऱ्या होत्या, परंतु ट्‌वेन्टी-20 मालिकेसाठी फलंदाजीस पोषक असलेल्या खेळपट्ट्या असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे धावांचा पाऊस पाहायला मिळू शकेल.


​ ​

संबंधित बातम्या