INDvsENG : नियमावर विराटची नाराजी; जाणून घ्या ‘सॉफ्ट सिग्नल’ म्हणजे काय?

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 20 March 2021

फलंदाजाचा झेल पडकण्यात आल्यावर तो जर संशयास्पद असेल तर मैदानावरील पंच टीव्ही पंचाकडे निर्णय सोपवतो, पण

अहमदाबाद : भारत-इंग्लंड यांच्यातील चौथा ट्‌वेन्टी-20 सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला, परंतु त्यापेक्षा सर्वाधिक चर्चा मैदानावरील आणि टीव्ही पंचांनी दिलेल्या वादग्रस्त निर्णयाची झाली. सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांना या निर्णयाचा फटका बसला, सुदैवाने भारताने सामना जिंकल्यामुळे टीकेची धग मर्यादित राहिली; परंतु भारतीय कर्णधार विराट कोहलीने नियमच चुकीचे असल्याची नाराजी व्यक्त केली. करो अथवा मरो अशी स्थिती असलेल्या सामन्यात असा एखादा निर्णय संघासाठी घातक ठरू शकतो, त्यामुळे ‘सॉफ्ट सिग्नल’च्या नियमाचा फेरविचार करावा, असे विराटने म्हटले आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात पंचांनी दिलेले सॉफ्ट सिग्नल सूर्यकुमार आणि सुंदर यांच्याविरोधात गेले.

‘सॉफ्ट सिग्नल’ म्हणजे काय?

फलंदाजाचा झेल पडकण्यात आल्यावर तो जर संशयास्पद असेल तर मैदानावरील पंच टीव्ही पंचाकडे निर्णय सोपवतो, पण आयसीसीच्या नियमाप्रमाणे मैदानावरील पंचाला त्याचा निर्णय द्यावा लागतो. यालाच ‘सॉफ्ट सिग्नल’ म्हणतात. टीव्ही रिप्लेमधूनही जर स्पष्ट होत नसेल तर मैदानावरील पंचानी दिलेला ‘सॉफ्ट सिग्नल’ कायम रहातो. मैदानावरील पंच जर टीव्ही पंचाकडे निर्णय सोपवत असेल तर त्यांनी दिलेल्या ‘सॉफ्ट सिग्नल’चे महत्त्व कशासाठी कायम ठेवायचे. तर त्यांच्यासाठी ‘मला माहित नाही’ असा पर्याय ठेवा, असे विराटने काहीसे उपहासाने सांगितले.

रहाणेच्या प्रामाणिकपणाचा दाखला

सर्वसाधारणपणे जमिनीलगतचे झेल पकडल्यावर क्षेत्ररक्षक आपण अचूकपणे झेल पकडल्याचे दर्शवत असतो आणि खेळाडूंचा आविर्भाव पाहून मैदानावर पंच ‘सॉफ्ट सिग्नल’ देत असतो, पण रहाणेसारखे प्रामाणिक खेळाडू सफाईदारपणे झेल पकडल्यावरही फुकटचे अवसान आणत नाहीत. विराटने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत रहाणेने अशाच प्रकारे पकडलेल्या झेलाचा दाखला दिला. त्यावेळी ‘सॉफ्ट सिग्नल’ नाबादचा होता, परंतु रिल्पेमध्ये रहाणेने अचूक झेल पकडल्याचे स्पष्ट दिसून आले होते.


​ ​

संबंधित बातम्या