INDvsENG : अश्विनच्या गिऱ्हाईकाला यावेळी वॉशिंग्टनने फसवलं (VIDEO)

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 4 March 2021

दोघांची जोडी जमलीय, असे वाटत असताना उपहारानंतर मोहम्मद सिराजने जॉनी बेयरस्ट्रोला पायचित केले.

अहमदाबादच्या मैदानावर चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातही पाहुण्या इंग्लंडच्या फलंदाजांनी फ्लॉप शो दाखवला. आघाडीचे गडी स्वस्तात माघारी फिरल्यानंतर बेन स्टोक्स आणि जॉनी बेयरस्ट्रो या जोडीनं संघाचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. दोघांची जोडी जमलीय, असे वाटत असताना उपहारानंतर मोहम्मद सिराजने जॉनी बेयरस्ट्रोला पायचित केले. तो 28 धावा करुन माघारी फिरला. दुसऱ्या बाजुला बेन स्टोक्सने कसोटी कारकिर्दीतील 34 वे अर्धशतक पूर्ण केले. 

मागील काही सामन्यापासून अश्विनच्या गोलंदाजीवर संघर्ष करताना दिसेलेल्या बेन स्टोक्सने अश्विनच्या पहिल्याच षटकात षटकार ठोकून निडर खेळी करण्याचे संकेत दिले. परिस्थितीनुसार त्याने डाव सावरलाही. सामन्यापूर्वी कर्णधार ज्यो रुटने वारंवार अश्विनचा शिकार होणाऱ्या बेन स्टोक्सचं समर्थन केले होते. अश्विनचा सामना तो नेटानं करेल, असे रुट म्हणाला होता. चौथ्या आणि अखेरच्या सामन्यात बेन स्टोक्सने अश्विनचा सामना केला, मात्र तो युवा अष्टपैलून वॉशिंग्टनच्या फिरकीत अडकला. 
 

अश्विननं 11 वेळा स्टोक्सला केलंय बाद 

आर अश्विन हा डावखुऱ्या फलंदाजांसाठी घातक ठरलेला गोलंदाज आहे. त्याने 200 हून अधिक डावखुऱ्या फलंदाजांना बाद केले आहे.  यात स्टोक्सला त्याने तब्बल 11 वेळा बाद केले आहे. त्यामुळे निश्चितच या दोघांचा सामना होतो त्यावेळी स्टोक्स अश्विनच्या गोलंदाजीवर कसा खेळणार याची चर्चा रंगत असते. मात्र यावेळी त्याला वॉशिंग्टनने एका सुंदर चेंडूवर चकवा दिल्याचे पाहायला मिळाले. वॉशिंग्टनचा चेंडू पॅडवर लागल्यानंतर रिव्ह्यूचा कोणताही विचार न करता बेन स्टोक्स माघारी फिरला. त्याने महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. 121 चेंडूत त्याने 2 षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने 55 धावा केल्या, यातील एक सिक्स स्टोक्सने अश्विनला लगावला. तर एक षटकार त्याने वॉशिंग्टनच्या षटकात खेचला.


​ ​

संबंधित बातम्या