INDvsENG :"मी पिच क्युरेटर असतो तर पुन्हा तशीच खेळपट्टी तयार केली असती"

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 2 March 2021

चार सामन्यांच्या मालिकेतील दोन सामन्यात फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय संघाने विजय नोंदवला.

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा अवघ्या दोन दिवसांत आटोपला होता. चेन्नईतील दुसऱ्या कसोटीप्रमाणेच अहमदाबादच्या कसोटीत फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवरुन आजी-माजी क्रिकेटर्सं संमिश्र प्रतिक्रिया देताना पाहायला मिळते. चौथ्या आणि अखेरच्या सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियवरील खेळपट्टी कुणाला साथ देणारी असेल, अशी चर्चाही रंगत आहे. दरम्यान  वेस्ट इंडिजचे दिग्गज सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी मोठं वक्तव्य केले आहे. जर मी पिच क्युरेटर असतो तर चौथ्या सामन्यासाठीही फिरकीला साथ देणारी खेळपट्टीच तयार केली असती, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. 

चार सामन्यांच्या मालिकेतील दोन सामन्यात फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय संघाने विजय नोंदवला. याचा टीम इंडियाला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील दावेदारी भक्कम करण्यासाठी मोठा फायदा झाला आहे. खेळपट्टीवरुन वाद सुरु असताना  चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात पाटा खेळपट्टी म्हणजेच फलंदाजांना अनुकूल खेळपट्टी तयार करण्यात येईल, असा अंदाज बांधण्यात येत आहे.  भारतातील मैदानात खेळताना फिरकीचे आव्हान परतवण्याची मानसिक तयारी असली पाहिजे, असे सांगत खेळपट्टीचे समर्थन केले आहे. त्यांनी फेसबुक पेजवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. 

Vijay Hazare Trophy 2021 : देवदत्तचा धमाका थांबत नसतो; सलग दुसऱ्या शतकासह स्पर्धेतील टॉपर

यात त्यांनी म्हटलंय की, जर मला संधी मिळाली तर चौथ्या कसोटीसाठी देखील मी पूर्वीप्रमाणेच खेळपट्टी तयार करण्याला पसंती दिली असती. भारत-इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या संदर्भात मला अनेकांनी प्रश्न विचारले. खेळपट्टीवर अनेकजण प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत आहेत. टीकाकारांना त्यांनी परदेशातील जलदगती गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीच उदाहरण दिले आहे. गूड लेंथवरुन उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर फलंदाजांना संघर्ष करताना आपण अनेकदा पाहिले आहे. त्याच प्रमाणे आता फिरकीसमोर गुडघे टेकणारे फलंदाज आपण पाहतोय, अशा आशयाचे वक्तव्य करत त्यांनी अहमदाबाद कसोटीतील खेळपट्टीचे समर्थन केले आहे.  कसोटी दोन दिवसांत आटोपल्यानंतर इंग्लंडने खेळपट्टीचा विचार न करता परिस्थिती समजून घेऊन खेळाचा दर्जा सुधारण्यावर भर द्यायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या