INDvsENG : 'फास्ट फूड' क्रिकेटमुळे बचाव कमजोर : विराट

 सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 March 2021

वेगवान खेळपट्टीवर उभे राहण्यासाठी निडर वृत्ती लागते, पण फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर जर बचावावर भरवसा नसला तर अडचणी निर्माण होतात.

अहमदाबाद : गेल्या काही वर्षांत मर्यादित षटकांच्या क्रिकेटचे महत्त्व वाढल्याने फलंदाज बचावावर पुरेसे लक्ष देत नाही. तीनचार सत्र फलंदाजी करण्याकरता लागणारे बचावाचे तंत्र आणि संयम कमी झाला आहे असे मत भारतीय कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी सराव केल्यानंतर सांगितले.

वेगवान खेळपट्टीवर उभे राहण्यासाठी निडर वृत्ती लागते, पण फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर जर बचावावर भरवसा नसला तर अडचणी निर्माण होतात. माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर फक्त चेंडू स्वीप करायची मला गरज वाटत नाही, कारण मला माझ्या बचावावर भरवसा आहे. फिरकीला बचावात्मक प्रकारे खेळताना चेंडू बॅटची कड घेऊन शॉर्ट लेग किंवा सिली पॉइंट झेल उडणार नाही याची काळजी घ्यावी लागते, असे विचार विराट कोहलीने मांडले.

INDvsENG : आम्ही तीन दिवसांत हरलो तेव्हा कोणी खेळपट्टी बघायला गेले नव्हते : विराट कोहली

सन 2014 मधील इंग्लंड दौऱ्यात जिमी अँडरसनने विराट कोहलीला बऱ्याच वेळा बाद केले होते, त्यानंतर विराटने अँडरसनला स्वत:ला बाद करू दिले नाही याविषयी बोलताना विराट म्हणाला, अँडरसन असा महान गोलंदाज आहे, ज्याच्याकडे कौशल्य आणि बुद्धी आहे. गेल्या काही सामन्यांत मी त्याला बाद झालो नाही, कारण गोलंदाज कोण आहे याकडे लक्ष न देता चेंडूवर नजर ठेवायला मी शिकलो आहे असे विराटने सांगितले.

#SachinUnacademyFilm: अपयशानंतरचे सुंदर यश; प्रेरणादायी व्हिडिओ व्हायरल

प्रत्येक सामना महत्वाचा

जागतिक कसोटी अजिंक्‍यपद अंतिम सामन्याबाबत खूप चर्चा केली जात आहे. मला वाटते ज्या संघांना कसोटी क्रिकेटचे खूप महत्त्व नाही, त्यांच्याकरता ही स्पर्धा प्रोत्साहन देणारी आहे. भारतीय संघ प्रत्येक सामनाच प्राणपणाने खेळतो म्हणून आम्हाला तसे बघायला गेले तर तोही एक सामनाच आहे. म्हणूनच आम्ही चौथ्या कसोटीवर लक्ष देत आहोत.

रोटेशन पॉलिसी योग्यच

सध्या जितके क्रिकेट खेळले जात आहे, त्याचा विचार करता खेळाडूंना योग्य वेळी विश्रांती देणेही महत्त्वाचे ठरते आहे. म्हणून रोटेशन पॉलिसी मला बरोबर वाटते. गेले काही दिवस क्रिकेट हे जैवसुरक्षा वातावरणात राहून खेळावे लागत आहे, जे कधी कधी एकसुरी होत आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी विश्रांती आणि कुटुंबाबरोबर वेळ घालवणे हाच एकमेव उपाय आहे असे विराट म्हणतो.

खेळपट्टी फिरकीस पोषक, पण?

चौथ्या कसोटी सामन्याकरता फिरकीला पोषक खेळपट्टी असेल, पण दोन्ही संघांतील फलंदाजांनी क्षमतेला न्याय देणारी कामगिरी केली तर सामना दोन दिवसांत संपणार नाही. फलंदाजांनी कौशल्य आणि संयम यांचा उपयोग करून धावा करणे अपेक्षित आहे, ज्यात मी स्वत:चाही समावेश करत आहे, विराटने खुल्या मनाने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या