INDvsENG : वाजवा रे, शिट्या, टाळ्या वाजवा; विराटचा मैदानावरूनच प्रेक्षकांशी संवाद! (VIDEO)

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 14 February 2021

भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियमवर उपस्थितीत असलेल्या चाहत्यांना विराटने कल्ला करण्याचे आवाहन केल्याचे पाहायला मिळाले.

पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर चेन्नईतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दमदार कमबॅक केले आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात 329 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडण्यात गोलंदाजांना यश मिळाले. सध्याच्या घडीला संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. प्रेक्षकांच्या उपस्थितीत इंग्लंड विरुद्ध खेळताना बरोबरी साधण्याचे संकेत मिळाल्यानंतर कर्णधार  विराट कोहली भलताच खूश झाल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियमवर उपस्थितीत असलेल्या चाहत्यांना तो कल्ला करण्याचे आवाहन करताना दिसले. शिटी वाजवून संघाला प्रोत्साहन द्या, अशी विनंती कोहलीने चाहत्यांकडे पाहून केली. बेन स्टोक्सची विकेट पडल्यानंतर  कोहलीने स्वत: तोंडात बोटे घालत चाहत्यांनी शिटी वाजवावी, अशी विनंती केल्याचे पाहायला मिळाले. प्रेक्षाकांनीही त्याला दाद दिली.

पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाने टीम इंडियाला 227 धावांनी पराभूत करतक मालिकेत आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या विजयाची आस दिसत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला होता. त्याला मोईन अलीने खातेही उघडू दिले नाही. पण रोहित शर्माच्या 161 धावा, अजिंक्य रहाणे आणि पंतची अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 329 धावांपर्यंत मजल मारली. 

फिरकीला अनुकूल वाटत असलेल्या खेळपट्टीवर अश्विन आणि अक्षर पटेल इंग्लिश खेळाडूंना नाचवत आहेत. आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडल्यामुळे टीम इंडियाने सामन्यात वर्चस्व मिळवले आहे. चहापानापर्ंयत 108 धावांत इंग्लंडने 8 विकेट गमावल्या होत्या. भारतीय संघ मोठ्या आघाडीसह मालिकेत बरोबरी साधण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.


​ ​

संबंधित बातम्या