INDvsENG : इंग्लंड संघ भारतात पोहचला; विमानतळावर झाली कोरोना टेस्ट

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 27 January 2021

अँड्रसनशिवाय डॉम बेस आणि जॅक लीच या फिरकीपटूंनी श्रीलंका दौऱ्यावर चांगली कामगिरी केली आहे. फिरकीसाठी नंदनवन असलेल्या भारतीय मैदानात त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची इंग्लंडला अपेक्षा असेल. 

श्रीलंकेला क्लिनस्विप देत आत्मविश्वास उंचावलेला इंग्लंडचा संघ भारताविरुद्धच्या दौऱ्यासाठी सज्ज झालाय. जो रुटच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ बुधवारी चेन्नईत दाखल झाला. विमानतळावर उतरल्यानंतर सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली असून सहा दिवस खेळाडू क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यात जो रुटने कर्णधाराला साजेसा खेळ करुन दाखवला आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात त्याने द्विशतक झळकावले. आशियातील मैदानात त्याने मोठी खेळी साकारली. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याने दीड शतकी खेळी करत संघाच्या मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला होता. कर्णधारासहित संघाचा फॉर्म पाहाता भारत आणि इंग्लंड यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी रंगतदार होणार असल्याची चिन्हे दिसतात.

श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी करण्यामध्ये इग्लिश गोलंदाजाचाही महत्त्वाचा वाटा राहिला आहे. अँड्रसनशिवाय डॉम बेस आणि जॅक लीच या फिरकीपटूंनी श्रीलंका दौऱ्यावर चांगली कामगिरी केली आहे. फिरकीसाठी नंदनवन असलेल्या भारतीय मैदानात त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची इंग्लंडला अपेक्षा असेल. 

भारत दौऱ्यावर इंग्लंडचा संघ 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेसह 5 टी-20 सामन्यांची मालिका आणि 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. 5 फेब्रुवारीला चेन्नईच्या मैदानातून भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होईल.  दुसरा सामनाही चेन्नईच्यात मैदानात रंगणार असून दोन्ही कसोटी सामना प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येतील.कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यात प्रेक्षकांना एन्ट्री मिळणार का? याबाबतची भूमिका बीसीसीआयने अद्याप स्पष्ट केलेली नाही.
 


​ ​

संबंधित बातम्या