IND vs ENG: भावाने भावाला दिली वनडे कॅप; कृष्णालाही 'प्रसिद्धी'

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 23 March 2021

विजय हजारे ट्रॉफीत दोघांनी दमदार कामगिरी केली होती. क्रुणालने आतापर्यंत 18 टी-20 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. क्रृणाल पांड्या आणि प्रसिद्ध कृष्णा हे वनडेत पदार्पण करत आहेत. हार्दिक पांड्याने भावाला वनडे कॅप दिल्याचे पाहायला मिळाले. यावेळे क्रृणाल पांड्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याने आकाशाकडे पाहत वडिलांच्या आठवणीला उजाळा दिला. विजय हजारे ट्रॉफीत दोघांनी दमदार कामगिरी केली होती. क्रुणालने आतापर्यंत 18 टी-20 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 

क्रुणाल पांड्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमालीची कामगिरी करुन लक्ष वेधले होते. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील 5 सामन्यात त्याने 129.33 च्या सरासरीने 388 धावा केल्या होत्या. फलंदाजीशिवाय त्याने गोलंदाजीतही कमाल दाखवली होती. प्रसिद्ध कृष्णाने विजय हजारे स्पर्धेतील 7 सामन्यात 14 विकेट घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून त्याने कमालीची कामगिरी केली होती. टी-20 मध्ये सातत्याने खराब कामगिरी करणाऱ्या लोकेश राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. रिषभ पंतच्या ऐवजी यष्टीरक्षक म्हणून केएल राहुलला पसंती देण्यात आली आहे.

युजवेंद्र चहलला देखील अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आलेले नाही. भारतीय संघ तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानात उतरला आहे. कुलदीप यादवच्या रुपात एका प्रमुख फिरकीपटूला संघात स्थान देण्यात आले आहे. भारत आणि  इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका नियोजित आहे. सर्व सामने पुण्याच्या मैदानात खेळवण्यात येणार असून उर्वरित दोन सामन्यात सुर्यकुमार यादवलाही संधी मिळू शकते. 


​ ​

संबंधित बातम्या