INDvsENG : सामन्याच्याअगोदर मोटेरावरील गवत गायब होईल: अँड्रसन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 February 2021

खेळपट्टीवर सध्या असलेले गवत मृगजळासारखे आहे. सामन्याच्या दिवशी ते गायब झालेले असेल, असा ठाम विश्‍वास अँडरसनने व्यक्त केला आहे.

अहमदाबाद : कसोटी मालिकेतील तिसरा सामना होत असलेल्या खेळपट्टीवर आत्ता तरी चांगले हिरवे गवत दिसत आहे; पण सामन्याच्या दिवशी गवताचे एकही पाते नसेल, असे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने म्हटले आहे.  येत्या बुधवारपासून प्रकाश झोतात सुरू होत असलेल्या या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीबाबतही चर्चा सुरू झाली आहे. नव्या तयार झालेल्या मोटेरा स्टेडियमवर बऱ्याच वर्षानंतर आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील तिसरा आणि चौथा सामनाही याच मैदानावर होत आहे.

चेन्नईत झालेल्या दुसऱ्या सामन्यासारखीच येथील खेळपट्टी असेल, असे अँडसरने सांगितले. तो पुढे म्हणतो, खेळपट्टीवर सध्या असलेले गवत मृगजळासारखे आहे. सामन्याच्या दिवशी ते गायब झालेले असेल, असा ठाम विश्‍वास अँडरसनने व्यक्त केला आहे. सामन्यासाठी नेमकी कशी खेळपट्टी असेल, हे पाहावे लागेल; परंतु जी काही परिस्थिती असेल, त्यानुसार खेळावे लागेल. चेंडू स्विंग झाला, तर उत्तमच, नाही तरी आम्हाला सर्वोत्तम गोलंदाजी करावीच लागेल, असे अँडरसन म्हणतो.

रोटेशन पॉलिसीनुसार जॉस बटलर, तसेच मोईन खान मायदेशी परतले आहे आणि जॉनी बेअरस्टॉ व मार्क वूड पुढच्या दोन सामन्यासाठी उपलब्ध झाले आहेत. याच धोरणानुसार पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी करूनही अँडरसनला दुसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली. प्रकाशझोतातील सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्याला विश्रांती देण्यात आली होती, असे अँडरसनने सांगितले. आपण तंदुरुस्त असून नव्या आव्हानांचा सामना करण्यास सज्ज झालो आहोत, असेही तो म्हणाला.

गुलाबी चेंडूला अधिक स्विंग

गुलाबी रंगाचे एस.जी. बनावटीचे चेंडू लाल रंगाच्या चेंडूपेक्षा चांगले स्विंग झाले, असा अँडरसनने सरावानंतरचा अनुभव सांगितला. भारतातला गुलाबी चेंडूवर खेळला जाणारा हा दुसराच कसोटी सामना आहे आणि त्यातही फेब्रुवारी महिन्यातला पहिला सामना आहे. त्यामुळे चेंडू कसा आणि किती स्विंग होईल, याचा अनुभव कोणालाच नाही, असे अँडरसनने सांगितले.
 


​ ​

संबंधित बातम्या