फक्त दोन रिव्हर्स स्विंगमुळं टीम इंडियाचा पराभव (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 9 February 2021

चौथ्या दिवसाच्या अखेरीस रोहित शर्माने आपला फ्लॉप शो कायम ठेवला. शुभमन गिलने खिंड लढवण्याची ताकद दाखवली, पण 50 धावा करुन तो चालता झाला आणि भारतीय संघ संकटात सापडला.

ऑस्ट्रेलियात दिमाखदार विजय नोंदवणाऱ्या टीम इंडियाला घरच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंकेतील आत्मविश्वास इंग्लंडच्या कामी आला. इंग्लिश फिरकीपटूंनी भारतीयांच्या तुलनेत वळवलेले अप्रतिम चेंडू आणि मोक्याच्या क्षणी जलदगती गोलंदाजांची मिळालेली साथ या कॉम्बोपॅकच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने टीम इंडियाला 227 धावांनी पराभूत करत मालिकेत आघाडी घेतली आहे. या विजयासह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळण्यासाठी आपली दावेदारीही भक्कम करत त्यांनी टीम इंडियाचे टेन्शन वाढवले आहे. 

इंग्लंडच्या विजयात अनेक पैलू आहेत. त्यातील एक म्हणजे कर्णधार ज्यो रुटने पहिल्या डावात केलेल द्विशतक. यावेळी त्याला सलामीवर सिब्लेनं 87 धावा करुन उत्तम साथ दिली. तो माघारी परतल्यानंतर बेन स्टोक्सने 80 + धावा केल्या. परिणामी इंग्लंडने पहिल्या डावात 578 धावा केल्या. पहिल्या डावात भारतीय गोलदांजाना यश आले नाही. नाणेफेक जिंकल्याचा पाहुण्या संघाला मोठा फायदाच झाला म्हणावे लागेल. 

इंग्लंडने डोंगराएवढ्या धावा उभारल्यानंत पहिल्या डावात भारताकडून आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले. रोहित शर्मा, विराट कोहली. अजिंक्य रहाणे यासह शुभमन गिल मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. पंत-पुजारामुळे सामना अनिर्णित तरी राहिल असे वाटले होते. दुसऱ्या डावात अश्विनच्या फिरकीतील जादू दिसली आणि सामना जिंकताही येऊ शकतो, असा विश्वास कुठतरी मनात निर्माण झाला. भारतीय संघाने 500+ धावा करणाऱ्या इंग्लंडच्या संघाला अवघ्या 178 धावात गुंडाळले. 

चौथ्या दिवसाच्या अखेरीस रोहित शर्माने आपला फ्लॉप शो कायम ठेवला. शुभमन गिलने खिंड लढवण्याची ताकद दाखवली, पण 50 धावा करुन तो चालता झाला आणि भारतीय संघ संकटात सापडला. अनुभवी जेम्स अँड्रसनने अप्रतिम रिव्हर्स स्विंगवर गिलच्या दांड्या उडवल्या. याच षटकात अजिंक्य रहाणेविरोधात त्याने पायचितची अपील केली. अंपायरने नॉट आउट दिल्यानंतर इंग्लंडने रिव्ह्यूही घेतला. पण अंपायर कॉलमुळे अजिंक्यला दिलासा मिळाला. पण जेम्सने यातून त्याला सावरु दिले नाही. पुढच्याच चेंडूवर त्याने अजिंक्यच्या दांड्या उडवल्या. हे दोन चेंडू सामन्याचा निकाल पलटणारे ठरले. शुभमन गिलहा फॉर्ममध्ये दिसत होता. दुसरीकडे अजिंक्य रहाणे मैदानात थांबला असता तर भारतीय संघाला सामना अनिर्णित ठेवण्यातही यश मिळाले असते. पण जीमीच्या दोन चेंडूनं खेळ पलटला.


​ ​

संबंधित बातम्या