BCCI चा रिव्ह्यू; चेन्नई कसोटीसाठी प्रेक्षकांना एन्ट्री मिळण्याचे दिले संकेत

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 31 January 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या मैदानात रंगणार आहे. या मैदानात रंगणाऱ्या सामन्यासाठी नियमावलीनुसार प्रेक्षकांना प्रवेश मिळणार हे निश्चित आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईमध्ये रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना एन्ट्री देण्यासंदर्भात सोमवारी निर्णय घेण्यात येणार आहे. यापूर्वी बीसीसीआयने चेन्नईतील दोन्ही कसोटी सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा निर्णय घेतला होता. पण आता केंद्र सरकारने नवी नियमावली जाहीर केल्यानंतर कसोटीसाठी प्रेक्षकांना प्रवेश देण्यासंदर्भात बीसीसीआय पुन्हा विचार करणार आहे. पहिला कसोटी सामना हा प्रेक्षकांशिवाय होणार असला तरी सोमवारी होणाऱ्या बैठकीत दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश देण्यासंदर्भात विचार केला जाणार आहे. 

केंद्र सरकारने कोविड-19 च्या नियमावलीत बदल केला आहे. क्रीडा क्षेत्रातील स्पर्धेसाठी स्टेडियमच्या क्षमतेच्या 50 टक्के प्रवेश दिला जावा, असे नव्या नियमावलीतून स्पष्ट करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकांची ये-जा पुन्हा सुरु झाल्यानंतर बीसीसीआय देखील कसोटी सामन्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश देण्याच्या विचारात आहे.  

Syed Mushtaq Ali Trophy 2021: शाहरुखचा चौकारानं तमिळनाडूचा विजय; दुसऱ्यांदा जिंकली स्पर्धा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या मैदानात रंगणार आहे. या मैदानात रंगणाऱ्या सामन्यासाठी नियमावलीनुसार प्रेक्षकांना प्रवेश मिळणार हे निश्चित आहे. मात्र चेन्नईतील निर्णयात बीसीसीआय बदल करणार आहे. तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय यांच्यातील चर्चेनंतर सोमवारी यासंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाईल.  

INDvsENG : बेन स्टोक्सचा चेन्नईत क्लोज कॅचिंग प्रॅक्टिसवर भर (VIDEO)

तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 5 फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासंदर्भात निर्णय घेणं अवघड आहे. यासाठी पुरेसा वेळ नाही. त्यामुळे प्रेक्षकांना प्रवेश देण्यासंदर्भात दुसऱ्या कसोटी सामन्याचाच विचार केला जाईल. चेपॉकच्या मैदानात 50,000 प्रेक्षक क्षमता आहे. त्यामुळे 50 टक्के प्रवेश देण्यात आला तर 25 हजार प्रेक्षकांना प्रवेश मिळू शकेल. 


​ ​

संबंधित बातम्या