'ढाई अक्षर प्रेम के'... सात वर्षांची प्रतिक्षा आणि कसोटीतील पहिली विकेट

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Sunday, 14 February 2021

यंदाच्या वर्षात कसोटी पदार्पण करणारा अक्षर पटेल हा चौथा फलंदाज असून एकंदरीत विचार केल्यास भारतीय संघासाठी कसोटी खेळणाऱ्यांच्या यादीत त्याचा 302 वा क्रमांक लागतो.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना चेन्नईच्या मैदानात रंगला आहे. पहिल्या कसोटीत दिमाखदार फलंदाजीची झलक दाखवलेल्या साहेबांचा संघ दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात कोलमडला आहे. पहिल्याच षटकात ईशांत शर्माने दिलेल्या धक्क्यानंतर फिरकीपटुंनी आपली जादू दाखवून दिली. अश्विनला अक्षर पटेलची साथ मिळाल्यानं इंग्लंडच्या संघाने उपहारापूर्वीच आघाडीचे चार फलंदाजांच्या विकेट गमावल्या. यात कर्णधार ज्यो रुटचा समावेश होता. पहिल्या कसोटी सामन्यात ज्यो रुटने दोन्ही डावात चांगली कामगिरी केली होती. इंग्लंडच्या विजयात त्याने मोलाचा वाटा उचलला. त्याची महत्त्वपूर्ण विकेट अक्षर पटेलनं मिळवली. कसोटी कारकिर्दीतील त्याची ही पहिली विकेट ठरली.  

यंदाच्या वर्षात कसोटी पदार्पण करणारा अक्षर पटेल हा चौथा फलंदाज असून एकंदरीत विचार केल्यास भारतीय संघासाठी कसोटी खेळणाऱ्यांच्या यादीत त्याचा 302 वा क्रमांक लागतो.  2014 च्या आयपीएलमध्ये अक्षर पटेलनं लक्षवेधी खेळ केला होता. या हंगामातील स्पर्धेत त्याला उद्योत्मुख खेळाडूचा पुरस्कारही मिळाला. या कामगिरीच्या जोरावरच  15 जून 2014 ला अक्षरने वनडेत पदार्पण केले. 38 वनडे सामन्यात त्याने 45 विकेट घेतल्या असून 181 धावा त्याच्या खात्यात जमा आहेत.

INDvsENG : रोहित-रहाणे याचा ‘आर’ फॅक्‍टर

वनडेतील पदार्पणानंतर सात वर्षांनी अक्षर पटेलला कसोटी संघात स्थान मिळाले. गुडघ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यास त्याला मुकावे लागले. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने ज्यो रुटच्या रुपात कसोटी कारकिर्दीतील पहिली विकेट घेत जोरदार सुरुवात केली आहे. 2015 मध्ये अक्षरने टी-20 मध्ये पदार्पण केले होते. 11 सामन्यात त्याने टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केले असून 9 विकेट आणि 68 धावा त्याच्या खात्यात जमा आहेत.

INDvsENG : आखाड्यातील ‘ट्रेलर’चा रोहित हिरो

चेन्नईची खेळपट्टीही पहिल्या दिवसांपासून फिरकीला साथ देताना दिसते. त्यामुळे पदार्पणात दमदार सुरुवात करुन ढाई अक्षर प्रेम के..झलक दाखवून देण्याची नामी संधी अक्षर पटेलकडे आहे. ज्यो रुटची विकेट घेत त्याने त्याची सुरुवातही केली आहे. दिवसाअखेर आणि कसोटीच्या निकालापर्यंत यात तो किती विकेट्सची भर घालणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 


​ ​

संबंधित बातम्या