INDvsENG : चेन्नईतील 'सिडनी पॅटर्न' लीचनं उधळला; अश्विन 'शंभरी'च्या आत माघारी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 8 February 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्यात अश्विन आणि हनुमा विहारीनं सामना अनिर्णित राखण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

ऑस्ट्रेलियात दिमाखदार विजय मिळवलेली टीम इंडिया घरच्या मैदानावर संकटात सापडली आहे. पाहुण्या इंग्लंड संघाने डोंगराऐवढी धावसंख्या उभारल्यानंतर आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडण्यात यश मिळवले. त्यामुळे चेन्नई कसोटीत विजय मिळवण्याची टीम इंडियाची आस धूसर झाली आहे. सध्याच्या परिस्थिती जी काही संधी आहे ती इंग्लंडच्या संघालाच आहे, असेच चित्र आहे. भारतीय संघाला पराभव टाळण्याचे मोठे आव्हान असून आता तळाच्या फलंदाजीला सिडनी पॅटर्नची पुनरावृत्ती करावी लागेल, असा तर्क क्रिकेट चाहत्यांनी लावण्यास सुरुवात केली. 

वॉशिंग्टन आणि अश्विनने याचे संकेतही दिले. दोघांनी संयमी खेळी करत भारतीय संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पण अश्विन लीचच्या फिरकीत अडकला. दुसऱ्या बाजूला वॉशिंग्टनने कसोटीतील दुसरे अर्धशतक साजरे केले. या जोडीनं सातव्या विकेटसाठी 180 चेंडूत 80 धावांची भागीदारी केली.     

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्यात अश्विन आणि हनुमा विहारीनं सामना अनिर्णित राखण्यात मोलाचा वाटा उचलला होता. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात  हनुमाने  161 चेंडूत नाबाद 23 धावा केल्या होत्या. दुसऱ्या बाजूला  अश्विनने 128 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या होत्या. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विन शंभर चेंडू सहज खेळून काढेल असे वाटत असताना अनोख्या नर्व्हस नाइंटीत तो बाद झाला.  


​ ​

संबंधित बातम्या