INDvsENG: "कसोटीपटूने खेळपट्टीच्या नावाने रडत बसायचे नसते"

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 23 February 2021

यापूर्वी भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याने खेळपट्टीचा फार चर्चा करणे योग्य नाही, असे म्हटले होते.

अहमदाबाद : भारतात कसोटी सामना सुरू होण्याअगोदर नेहमीच खेळपट्टीची चर्चा होत असते; परंतु इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्‍सने खेळपट्टीबाबतची चर्चा दुर्लक्षित केली. कसोटी खेळणाऱ्या खेळाडूला सर्व परिस्थितीत आपली गुणवत्ता दाखवता यायला हवी, असे त्याने सांगितले.

नव्याने तयार झालेल्या मोटेरा स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल, हे सांगणे कठीण आहे; परंतु श्रेष्ठ फलंदाजांना समोर कोणतीही परिस्थिती असली, तरी त्यावर तुम्हाला खेळता यायला हवे. भारतात नेहमीच आव्हाने अधिक असतात; मात्र यश मिळवायचे असेल, तर यातून मार्ग काढावाच लागतो, असे स्टोक्‍सने एका इंग्लिश वर्तमानपत्रात लिहिलेल्या स्तंभलेखात म्हटले आहे. प्रतिकूल परिस्थिती हा खेळाचा भाग असतो आणि अशी आव्हाने आपण आनंदाने स्वीकारायला हवीत, असे स्टोक्‍सने म्हटले आहे. 

यापूर्वी भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याने खेळपट्टीचा फार चर्चा करणे योग्य नाही, असे म्हटले होते. खेळपट्टीचा अंदाज घेऊन गियर टाकता यायला हवा, असे सांगत त्याने खेळपट्टीच्या मुद्याला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही, असे म्हटले होते. 

चेन्नईच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला मोठ्या फरकाने पराभूत केले. या सामन्यात फिरकीला खेळपट्टीने चांगली साथ दिली. यावरुन चांगलीच चर्चा रंगली. अहमदाबादच्या कसोटी सामन्यात खेळपट्टीवर गवत दिसत आहे. पण सामन्याच्या दिवशी हे गवत छाटून पुन्हा ही खेळपट्टी फिरकीला साथ देईल, अशी करुन इंग्लंडसमोर फिरकीला खेळण्याचे आव्हान निर्माण करण्यात येईल, अशा आशयाचे वक्तव्य इंग्लंडचा जलदगती गोलंदाज अँड्रसन याने केले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या