INDvsENG : बाचाबाचीनंतर बेन स्टोक्सनं काढला विराट कोहलीचा काटा! (VIDEO)

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 5 March 2021

2014 नंतर पुन्हा एकदा इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत तो दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे.

 भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या सामन्यातील पहिल्या दिवशी विराट कोहली आणि इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स यांच्यात बाचाबाची झाली होती. बेन स्टोक्‍सने आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप करत मोहम्मद सिराजने विराटकडे धाव घेतली. त्यानंतर  कोहली आणि स्टोक्‍समध्ये बाचाबाची झाली. पंचांनी त्यांना दूर केल्याचे यावेळी दिसले. कोहलीने त्यानंतर रिषभ पंतला जास्त बडबड करीत राहण्याची सूचना केली होती. चेन्नई कसोटीनंतर या मालिकेत दुसऱ्यांदा स्टोक्सनं विराट कोहलीची विकेट घेतली. आतापर्यंत कसोटीमध्ये पाचव्यांदा स्टोक्सने विराटला बाद केले आहे. चौथ्या आणि अखेरच्या सामन्यातील पहिल्या डावात विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. 

भारताच्या धावफलकावर 40 धावा असताना पुजाराच्या रुपात भारतीय संघाला दुसरा धक्का बसला. पुजारा 17 धावा करुन परतला. लीचने त्याला पायचित केले. यावेळी भारतीय संघाने रिव्ह्यूव्हही गमावला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने लीचच्या षटकात परफेक्ट डिफेन्स काय असतो, याचे उदाहरण दाखवून दिले. मात्र स्टोक्सच्या उसळत्या चेंडूने त्याला चकवा दिला. विकेटमागे  फोक्सने कोणतीही चूक न करता त्याचा झेल टिपला. 8 चेंडूचा सामना करुन विराटला खातेही न उघडता परतावे लागले.

2014 नंतर पुन्हा एकदा इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत तो दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. चेन्नईतील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात मोईन अलीने विराट कोहलीला शून्यावर बाद केले होते. चेन्नईतील पहिल्या कसोटी सामन्यात बेन स्टोक्सनेच विराट कोहलीची विकेट घेतली होती. याशिवाय 2014 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात विराटवर अशीच नामुष्की ओढावली होती. लॅम प्लंकेट आणि जेम्स अँडरसन यांनी त्याला शून्यावर बाद केले होते. 


​ ​

संबंधित बातम्या