PM मोदी स्टेडियम अन् अदानी-अंबांनी एन्ड; सोशल मीडियावर रंगला अनोखा 'सामना'

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 24 February 2021

भाजप आणि सरकारला समर्थन करणारी मंडळी हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगत नामांतरावर समाधान व्यक्त करत आहेत.

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना खेळवण्यात येत आहे. स्टेडियमच्या उद्घाटनादिवशी सरदार पटेल नावाने ओळखले जाणारे स्टेडियम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा झाली. भाजप आणि सरकारला समर्थन करणारी मंडळी हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगत नामांतरावर समाधान व्यक्त करत आहेत. दुसरीकडे सामना सुरु झाल्यानंतर गोलंदाज अंबानी-अदानी एन्डवरुन मारा करत असल्यामुळे कसोटी सामन्याला एक वेगळाच रंग आल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. 

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव दिल्यानंतर राजकीय गोटातूनही अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेससह अन्य पक्षांनी मोदींनी स्वत:च आपला सन्मान करुन सरदार वल्लभभाई पटेल यांचा अपमान केल्याचा सूर उमटत आहे. मोदींच्या समर्थनात उसळलेल्या लाटेमध्ये काही युजर्स भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू ते राजीव गांधी यांची स्टेडियमला दिलेल्या नावाची लिस्ट सोशल मीडियावर शेअर करत आहेत. मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यात लढत रंगली असताना सोशल मीडियावर मोदी समर्थक वर्सेस मोदी विरोधक असा सामना रंगला आहे. यात मैदानाला अंबानी आणि आदानी या दोन एन्डची भर पडल्याने विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे.  

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात पहिल्या दिवशी इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकली. मात्र ते प्रथम फलंदाजी करताना फिरकीच्या जाळ्यात अडकले. संपूर्ण संघ पहिल्या डावात अवघ्या 112 धावांत गुंडाळला. भारतीय संघाने पहिल्या डावाला सुरुवात केली असून सध्याच्या परिस्थितीत भारतीय संघ वर्चढ दिसत आहे. सामन्याच्या खेळपट्टीवरुन वाद-विवाद रंगत असताना आता थेट स्टेडियमचे नावावरुन वाद रंगतानाचे चित्र तिसऱ्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाले.
 


​ ​

संबंधित बातम्या