किंग कोहली म्हणाला, ईशांतच्या लांब केसांचेही कौतुकच वाटते

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 February 2021

कप्तानी केल्यावर केसांचे काय हाल होतात हे धोनी आणि माझ्याकडे बघून तुम्हाला कळत असेलच, विराट कोहली ईशांतबद्दल म्हणाला.

100 कसोटी सामने खेळणे हेच कमाल मानले जाते. मग भारतीय वेगवान गोलंदाजाने 100 कसोटी खेळण्याचा पराक्रम पूर्ण केला तर त्याचे कौतुक करायलाच हवे. इशांतने कष्ट करून ते साध्य केले आहे, ईशांतचा मला खूप अभिमान वाटतो असे विराटने सांगितले

ईशांत आणि मी खूप लहानपणापासून दिल्ली संघाकरता एकत्र क्रिकेट खेळत आलो आहोत. आम्हा दोघांमध्ये उत्तम संवाद आहे, ज्याने मी सर्वोत्तम कामगिरी करायला कप्तान म्हणून त्याला प्रोत्साहन देतो. आम्हा फलंदाजांना हेल्मेट घालून जास्त काळ खेळावे लागत असल्याने आमचे डोक्‍यावरचे केस शाबूत राहत नाहीत. 100 कसोटी खेळूनही इशांतचे केस अजून चांगलेच लांब आहेत याचेही मला कौतुक आहे. कप्तानी केल्यावर केसांचे काय हाल होतात हे धोनी आणि माझ्याकडे बघून तुम्हाला कळत असेलच, विराट कोहली ईशांतबद्दल बोलताना म्हणाला.

भारतीय संघाला गुलाबी चेंडूवर कसोटी सामना खेळताना काय आव्हान समोर येतात हे माहीत आहे. आम्ही त्याकरता तयारी केली आहे. संधी प्रकाशात गुलाबी चेंडू दिसायला थोडी अडचण येते. तसेच काहीही वातावरण आणि खेळपट्टी असली तरी गुलाबी चेंडू वेगवान गोलंदाजांना काही ना काही मदत करतोच असा आमचा अनुभव आहे. आम्हाला एक नाही तर दोनही सामने चांगले क्रिकेट खेळून जिंकायचे आहेत. आम्ही कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याचा विचार करत नाही आहोत, तर चांगले क्रिकेट पाच दिवस सातत्याने खेळण्याची तयारी करत आहोत, असे विराटने सांगितले.

सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियम नुसतेच भव्य नाही, तर सुंदर आहे. खेळाडूंकरता उभारण्यात आलेल्या सुविधा चांगल्या आहेत. जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट मैदानावर मोठ्या संख्येच्या प्रेक्षकांसमोर सामना खेळायला आम्ही उत्सुक आहोत. प्रेक्षकांचा पाठिंबा मोलाचा असतो हे दुसऱ्या कसोटी सामन्यातून दिसून आले आहे, असे विराटने मैदानाबद्दल बोलताना सांगितले.
 
  


​ ​

संबंधित बातम्या