INDvsENG : गवगवा झालेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमची 'अनटोल्ड स्टोरी'

सुनंदन लेले, सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 March 2021

सरदार पटेल क्रीडा संकुलातील नरेंद्र मोदी स्टेडियमचा गवगवा बराच झाला; मात्र आता हळूहळू काही गोष्टी समोर येत आहेत.

अहमदाबाद :  भारत आणि इंग्लंड मालिकेतील तिसरी क्रिकेट कसोटी दोन दिवसांत संपल्यावर चहूबाजूंनी टीका झाली. भारतीय संघाने 10 गडी राखून विजय मिळवल्यावर चर्चा खराब खेळपट्टीची होत आहे. भारतीय खेळाडूंनी खेळपट्टी कसोटी खेळण्यासाठी योग्य असल्याची दवंडी पिटली, तरी संयोजकांना पूर्वतयारीत उणीव राहिल्याची जाणीव आहे. पाच दिवसांचा सामना दोन दिवसात संपल्याने अनेकांचे नुकसान झाले, त्यात गुजरात क्रिकेट संघटना, प्रायोजक तसेच प्रेक्षकही आहेत.

सरदार पटेल क्रीडा संकुलातील नरेंद्र मोदी स्टेडियमचा गवगवा बराच झाला; मात्र आता हळूहळू काही गोष्टी समोर येत आहेत. तिसऱ्या कसोटीसाठी छापलेल्या तिकिटावर सामना होणार असलेल्या स्टेडियमचे नावच नव्हते. गुजरात संघटनेने कसोटीच्या पहिल्या दिवशी स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव दिले, त्यामुळे अगोदरच छपाई झालेल्या तिकिटावर सामना कुठे होणार आहे, याचा उल्लेख नव्हता.

Vijay Hazare Trophy 2021 :बिचारा अय्यर 198 धावांवर रन आउट; भावाचं द्विशतक हुकलं!

या कसोटीचे सीझन तिकीट काढणाऱ्यांना मोठा दणका बसला. दोन दिवस सामना पाहताना त्यासाठी पाच दिवसांचे पैसे मोजावे लागले. केवळ ही कसोटी पाहण्यासाठी दिल्लीहून श्वेताभ पाठक आला होता. ‘मोठे नुकसान झाले. दोन दिवसच सामना झाला. म्हणजे तीन दिवसांचे पैसे वाया गेले. मी कसोटीचा चाहता आहे. चांगला सामना पाहण्यासाठी आलो होतो. कसले काय, या विकेटमुळे सामन्याची मजाच आली नाही. भारतीय संघ जिंकूनही समाधान झाले नाही,’ असे त्याने सांगितले. तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या दिवसाचे तिकीट काढलेल्यांना सामना न होऊनही तिकिटाचे पैसे परत मिळणार नसल्याचे समजते.

ICC Test Rankings : रोहितची सर्वोत्तम रँकिंगला गवसणी; अश्विनलाही झाला फायदा

मालिकेचे प्रायोजक पेटीएम असूनही खाण्याच्या स्टॉलवर पेटीएमने पैसे देण्याची सुविधा नव्हती, त्यामुळे रोख रक्कम नसलेल्यांना पाणी पीत सामना बघावा लागला, याकडे श्वेताभने लक्ष वेधले. त्याचबरोबर मैदानात सगळीकडे प्लास्टिक होते, याबद्दलही प्रेक्षकांनी खेद व्यक्त केला. 

सर्वात जास्त तोटा पुरस्कर्ते आणि दूरचित्रवाणी प्रक्षेपणाचे हक्क विकत घेतलेल्या स्टार स्पोर्टस्‌चा झाला, पण याबाबत उघडपणे कोणीच काही बोलत नाही. प्रायोजकांना दोन दिवसांच्या जाहिरातींवर समाधान मानावे लागले. स्टार स्पोर्टस्‌ला दोनच दिवसांचे थेट प्रक्षेपण करायला मिळाल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले. एकंदरीत विचार केल्यास केवळ इंग्लंड खेळाडूंचा नव्हे, तर प्रेक्षक, प्रायोजक आणि टीव्ही प्रक्षेपक सगळ्यांनाच चौथ्या कसोटीचा विचार धडकी भरवणार आहे.  
 


​ ​

संबंधित बातम्या