INDvsENG : रोहित IN पण; KL राहुलसाठी सूर्या झाला बळीचा बकरा!

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 16 March 2021

विराट कोहलीने मागील सामन्यात अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलवर विश्वास दाखवत रोहितला जागा करण्यासाठी सुर्यकुमार यादवला बाकावर बसवले आहे. 

इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विश्रांती देण्यात आलेल्या हिटमॅन रोहित शर्माला तिसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. एका बाजूला रोहितला संधी देण्यात आली असली तरी सूर्यावर पुन्हा बाहेर बसण्याची वेळ आली आहे. विराट कोहलीने मागील सामन्यात अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलवर विश्वास दाखवत रोहितला जागा करण्यासाठी सुर्यकुमार यादवला बाकावर बसवले आहे. 
 मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने रोहित-राहुल डावाची सुरुवात करणार असे वक्तव्य केले होते. मात्र नाणेफेक झाल्यानंतर त्याने रोहितला काही सामन्यात विश्रांती देण्यात येणार असल्याचे सांगितले.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पहिल्या सामन्यात गब्बर शिखर धवनला स्थान देण्यात आले. विराटने त्याचा उल्लेख तिसरा सलामीवीर म्हणून केला होता. या अनुभवी गड्याला  दमदार खेळी दाखवण्यात अपयश आले  दुसऱ्या सामन्यात त्याला बाकावर बसवुन आयपीएमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी खेळी करणाऱ्या ईशान किशनला संधी मिळाली. त्याने संधीच सोन करत अन्य सहकाऱ्यांचे टेन्शन वाढवले. ईशान किशनच्या दमदार खेळीनंतर बदलाच्या प्रयोगावेळी रोहितला संघात जागा घेताना खुद्द विराट कोहली विश्रांती घेणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात पडला होता. दुसरीकडे लोकेश राहुलच्या ऐवजी रोहितला संधी मिळेल, अशी चर्चाही सुरु होती. मात्र यापैकी काहीच घडले नाही. रोहित प्लेइंग इलेव्हनमध्ये आला पण त्याच्या ऐवजी सुर्यकुमार यादवला बाहेर बसवण्यात आले. पदार्पणाच्या सामन्यात बॅटिंगचा नंबरही आला नाही, त्याला पुन्हा संधी न मिळणे हा प्रयोग समजण्यापलीकडचा आहे. 

ही महिला ठरणार क्रिकेटच्या मैदानातील खरी वाघीण; पुरुषांना देणार ट्रेनिंग

आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी संघ बांधणीसाठी इंग्लंड विरुद्धची टी-20 मालिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मात्र मालिकेतील पहिल्या सामन्यांपासून बदलाचे प्रयोग समजण्यापलीकडे आहे. पहिल्या सामन्यात लोकेश राहुल आणि शिखर धवनने भारताच्या डावाची सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात ईशान किशन आणि लोकेश राहुल ओपनिंगला आले. यात लोकेश राहुल शून्यावर बाद झाला होता. तिसऱ्या सामन्यात रोहितसोबत पुन्हा लोकेश राहुल सलामीला आला आहे. मागच्या सामन्यात संघाला धमाकेदार सुरुवात करुन देणाऱ्या ईशानला खालच्या क्रमांकावर खेळवण्याचा प्रयोग दिसतोय. हे बदल समजण्यापलीकडचे आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने जोरदार कमबॅक करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. तिसरा सामना जिंकून आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील असेल. पण बदलामुळे मालिकेवर परिणाम होणार का? हे येणारा काळच ठरवेल.


​ ​

संबंधित बातम्या