INDvENG : सूर्याच्या स्फोटक खेळीला सीमारेषेवर 'ग्रहण'; व्हिडिओ एकदा पाहाच

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 20 March 2021

सुर्यकुमार यादव पुन्हा एकदा सीमारेषेवर झेलबाद झाल्याचे पाहायला  मिळाले.

इंग्लंड विरुद्धच्या निर्णायक टी-20 सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघावर पहिल्यांदा बॅटिंग करण्याची वेळ आली. लोकेश राहुलला बाकावर बसवल्यानंतर विराट कोहलीने रोहित शर्मासोबत डावाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. या जोडीने मालिकेतील सर्वोत्तम ओपनिंग भागीदारी करुन देत संघाला मजबूत स्थितीत आणले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी पहिल्या 9 षटकात 10 पेक्षा अधिकच्या सरासरीने 94 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा 64 धावा करुन माघारी फिरल्यानंतर सुर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यानेही सुरुवातीपासूनच आक्रमक तेवर दाखवले. 

आदिल रशिदच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. त्याने 17 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 32 धावा ठोकल्या. चौथ्या टी-20 सामन्यात टी-20 कारकिर्दीत पहिले अर्धशतक झळकलेला सुर्या पुन्हा एकदा अर्धशतकाला सहज गवसणी घालेल, असे वाटत असताना सर्वोत्तम क्षेत्ररक्षणामुळे त्याला तंबूत परतावे लागले. सीमारेषेवर क्रिस जार्डनने चेंडू पकडत जेसन रॉयच्या हाती सोपवला आणि स्वत: सीमारेषेबाहेर गेला. थर्ड अंपायरने रिप्लाय पाहून सुर्या बाद असल्याचा निर्णय दिला. सुर्याने कर्णधार कोहलीच्या साथीने 26 चेंडूत 49 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. 

INDvsENG : बदलाच्या प्रयोगात विराट-रोहित जोडी ठरली हिट

पाच सामन्यांच्या मालिकेत सुर्यकुमार यादवला तीन सामन्यात संधी मिळाली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात पदार्पण केले. या सामन्यात भारतीय संघाने 8 विकेट राखून विजय नोंदवला होता. यावेळी त्याला बॅटिंगची संधीही मिळाली नव्हती. तिसऱ्या सामन्यात त्याला बाकावर बसवण्यात आले. ईशान किशन दुखापतग्रस्त असल्यामुळे चौथ्य्या टी-20 सामन्यात त्याला पुन्हा संधी मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करताना त्याने 57 धावांची खेळी केली होती. या सामन्यात डेविड मलान याने त्याचा झेल टिपला होता. त्याच्या विकेटवरुन चांगलाच वाद निर्माण झाला होता. तो बाद नसताना त्याला तंबूत परतावे लागले, असा सूर उमटला होता. कर्णधार विराट कोहलीने सॉफ्ट सिग्नलवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत नाराजी व्यक्त केली होती.


​ ​

संबंधित बातम्या