INDvENG: पंत खेळाचा रंगच बदलतो : रोहित

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 March 2021

रिषभ पंत वेगळा फलंदाज आहे, त्याची शैली भिन्न आहे. तो नैसर्गिक आक्रमक खेळाडू आहे. त्याने आपल्या खेळात चांगल्या बचावाची भरही घातली आहे.

अहमदाबाद : दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा खेळपट्टीवर दवाचा अंश होता. दोनही वेगवान गोलंदाज चांगला मारा करत होते आणि त्यांना  खेळपट्टीकडून मदत मिळत होती. चांगल्या चेंडूला मान द्यायचा. संयम ठेवायचा आणि मोठे फटके मारायची घाई करायची नाही हे मी ठरवले होते. पहिल्या चार तास किती धावा झाल्या आणि शेवटच्या सत्रात किती झाल्या. अर्थातच त्याला रिषभ पंतची खेळी कारण होती, म्हणूनच तो खेळाचा रंग बदलणारा खेळाडू आहे, अशा शब्दांत रोहितने पंतचा गौरव केला.

रिषभ पंत वेगळा फलंदाज आहे, त्याची शैली भिन्न आहे. तो नैसर्गिक आक्रमक खेळाडू आहे. त्याने आपल्या खेळात चांगल्या बचावाची भरही घातली आहे. त्याला त्याच्या शैलीत खेळून द्यायला हवे. एखाद्यावेळेला तो फटका मारताना बाद झाला तर टिका करायला नाही पाहिजे. कारण जेव्हा तो खेळतो तेव्हा खेळाचा रंग तो कसा बदलतो हे आज बघायला मिळाले आहे, असे रोहित दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर म्हणाला.

अगदी खरे सांगायचे तर आम्ही अडचणीत होतो. पंत - वॉशिंग्टनची भागीदारी आम्हाला तारून गेली. पंतने सुरुवातीला सावध फलंदाजी करून जम बसवला आणि मग धाडसी फटकेबाजी केली. तो असा खेळाडू आहे जो खेळू लागल्यावर सामन्यावर न पुसता येणारा ठसा उमटवतो. आजची खेळी त्याचाच नमुना आहे.
भारताच्या खात्यात 89 धावांची आघाडी आहे आणि अजून वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल चांगली फलंदाजी करत आहेत. सामन्यावर पकड मिळवायला योग्य पावले आम्ही उचलली आहेत.


​ ​

संबंधित बातम्या