INDvsENG : 'छापा-काटा'च्या खेळात 'विराट' पराभवाचा 'सिलसिला', पण...

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 28 March 2021

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील 12 व्या सामन्यातही विराटला टॉस जिंकण्यात अपयश आले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पुण्याच्या गहुंजे मैदानावर रंगला आहे. निर्णायक सामन्यातही नाणेफेकीचा कौल विराटच्या विरोधात लागला. विराटने नाणे भिरकावले आणि इंग्लंडच्या कर्णधाराने 'छापा' मागत नाणेफेक जिंकण्याची छाप सोडली. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील 12 व्या सामन्यातही विराटला टॉस जिंकण्यात अपयश आले. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराटने एकदाच नाणेफेक जिंकली. तर  इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अहमदाबादच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात विराटने एकदा टॉस जिंकला होता.  

टी 20  मालिकेत विराट कोहलीने दुसऱ्या सामन्यात टॉस जिंकला होता. याशिवाय उर्वरित सामन्यात टॉसचा कौल हा विराटच्या विरोधात लागला. 12 सामन्यात एकूण 10 वेळा टॉसवेळी विराटच्या पदरी निराशा आली. मैदानातील 'छापा-काटा' खेळात विराटला अपयश आले असले तरी त्याच्या नेतृत्वाखालील संघाने कसोटी आणि टी-20 मालिका जिंकत टॉस जिंकून मालिका जिंकता येत नाही तर त्यासाठी चांगला खेळ करावा लागतो, हे दाखवून दिले आहे. तिसऱ्या आणि निर्णायक वनडेत असाच खेळ करण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील असेल.  

IPL 2021 : रात्रीच्या जमावबंदीचा मुंबईतील आयपीएलवर परिणाम होणार?

2013 पासून विराट कोहलीने 92 पैकी 40 वनडे सामन्यात  टॉस जिंकला आहे. टॉसमध्ये तो अपयशी ठरला असला तरी टीम इंडियाने त्याच्या नेतृत्वाखाली 63 सामन्यात विजय मिळवला आहे. टॉस विनिंग पेक्षा मॅच जिंकण्याची टक्केवारी 68 टक्के असून ती समाधानकारक आहे.  टी-20 फॉर्मेटमध्ये विराट कोहलीने 40 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले असून 17 वेळा त्याने टॉस जिंकला आहे.  कसोटीमध्ये कोहलीने 60 सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केले असून यात त्याला 27 वेळा टॉस जिंकण्यात यश मिळाले आहे. कसोटीत त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 36 सामन्यात विजय मिळवला आहे.  विराट कोहलीला टॉसमध्ये अपयश येत असले तरी पण त्याच्या नेतृत्वाखाली मॅच जिंकण्याची टक्केवारी ही टॉस गमावण्याच्या टक्केवारीपेक्षा उत्तम आहे. 


​ ​

संबंधित बातम्या