INDvsENG : पंतनं मैदानातच खाल्ली रोहितची 'थप्पड', सेहवागनं शेअर केला व्हिडिओ

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 15 February 2021

दुसऱ्या डावात त्याला बढती मिळाली होती. पण त्याला अवघ्या 8 धावांवर माघारी परतावे लागले. 

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसरा कसोटी सामना चेन्नईच्या मैदानात सुरु आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने मालिकेत कमबॅक करण्याचे संकेत दिले. दुसऱ्या दिवशी मैदानात एक मजेशीर घटना घडल्याचे पाहायला मिळाले. भारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला. यात पंतने नाबाद 58 धावांची खेळी केली. इंग्लंडचे फलंदाज हजेरी लावून माघारी परतत असताना सुरु असलेल्या सेलिब्रेशनवेळी रोहित शर्माने गमतीने पंतला थप्पड मारल्याचे दिसले. या घटनेचा व्हिडिओ विरेंद्र सेहवागने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलाय. 

भारतीय संघाचा डाव आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशीच इंग्लंडचा पहिला डाव आटोपला. अश्विनची फिरकी आणि इतर गोलंदाजांची त्याला मिळालेली साथ याच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडला अवघ्या 134 धावांत गुंडाळले.  रविचंद्रन अश्विनने 43 धावा खर्च करुन पाच विकेट घेतल्या.   चेन्नईच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात रिषभ पंतने 77 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने नाबाद 58 धावांची खेळी केली. कसोटीतील त्याचे हे सलग चौथे अर्धशतक आहे. दुसऱ्या डावात त्याला बढती मिळाली होती. पण त्याला अवघ्या 8 धावांवर माघारी परतावे लागले. 

INDvsENG : अश्विननं पाहुण्या इंग्लंडची जिरवली; मैदानाबाहेर भज्जीनं घेतली ईशाची फिरकी

चेन्नईतील पहिल्या कसोटी सामन्यात त्याने  88 चेंडूत 91 धावांची खेळी केली होती. यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ब्रिस्बेनच्या मैदानात त्याने नाबाद 89 धावा केल्या होत्या. सिडनीच्या मैदानात त्याचे शतक अवघ्या 3 धावांनी हुकले होते. 97 धावांवर तो बाद झाला होता. 
चेन्नईतील दुसऱ्या  कसोटीत फलंदाजीनंतर यष्टीमागेही त्याने कमालीची चपळाई दाखवली. त्याने ओली पोप आणि जॅक लीचचा अप्रितम झेल टिपल्याचेही पाहायला मिळाले.  
 


​ ​

संबंधित बातम्या