हिरवे हिरवे गार गालिचे... मोदी स्टेडियमवर मराठी व्यक्तीचे ठसे

सुनंदन लेले, सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 February 2021

पडद्यामागचा कलाकार असलेला अभय पाटणकर हा ना प्रसिद्धीच्या मागे आहे, ना प्रसिद्धी मिळवण्याच्या. आपण बरे, आपले काम बरे, असा हा माणूस आहे.

अहमदाबाद : अहमदाबादच्या नव्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवरून जोरदार वादंग निर्माण झाले असले, तरी दोनही संघांतील खेळाडूंनी मैदानाची तोंडभरून स्तुती केली आहे. नुसतेच दिसायला बाहेरील मैदान हिरवेगार नाही, तर पायांनाही सुखकारक आहे. मैदान कोणी तयार केले याचा शोध घेतला असता अभय पाटणकर या मराठी माणसाने मोदी स्टेडियमवर हिरवेगार गवत फुलवले असल्याचे स्पष्ट झाले.

पडद्यामागचा कलाकार असलेला अभय पाटणकर हा ना प्रसिद्धीच्या मागे आहे, ना प्रसिद्धी मिळवण्याच्या. आपण बरे, आपले काम बरे, असा हा माणूस आहे. संकुलाचा बाहेरील भाग, प्रेक्षकांच्या सर्वोत्तम सुविधा असलेले प्रेक्षागृह, सामना घडतो ती खेळपट्टी आणि त्याच्या सोबतीला बाहेरील मैदान अशा सर्व गोष्टींचा सारासार विचार करून जर निर्मिती झाली, तरच ते स्टेडियम सर्वोत्तम होते. बाहेरील मैदानाचे गवत किती सुदृढ आहे, याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते, असे अभय पाटणकर सांगू लागला.

स्टेडियममधील मैदान कसे तयार केले, याविषयी बोलताना अभय म्हणाला, मैदान म्हणजे आऊटफिल्ड तयार करताना गवत कसे निरोगी असेल आणि पाण्याचा निचरा कसा बरोबर होईल, या दोन गोष्टींचा विचार करून मग काम केले. मला ग. दि. माडगुळकरांच्या ओळी आठवतात... माती, पाणी, उजेड, वारा तूच मिसळशी सर्व पसारा...आभाळच मग ये आकारा. अगदी तसेच आहे योग्य आऊटफिल्डची निर्मिती करताना. तसे बघायला गेले, तर मी केमिकल इंजिनियर आहे. माझा टूल रूमचा छोटेखानी व्यवसाय होता; पण खरं सांगतो मला खेळपट्टीबाहेरचे मैदान घडवण्याची फार हौस आहे. पहिली संधी वानखेडे मैदानावर काम करायची मिळाली. 

INDvsENG : खेळपट्टीवरुन इंग्लंडचं 'नो_रडगाणं'; टीम इंडियाचं टेन्शनच मिटलं

सिस्टीम रेक्‍स नावाने  2010 मध्ये काम सुरू केले ते 2011 मध्ये वानखेडेवर होणाऱ्या वर्ल्डकप अंतिम सामन्यासाठी. त्याचबरोबर चांगली फुटबॉलची मैदाने तयार केली. नुकतेच आम्ही रिलायन्स कंपनीच्या घणसोली मैदानाच्या बाहेरील मैदान आणि 11 खेळपट्ट्यांचे काम पूर्ण केले जिथे मुंबई इंडियन्स संघाने सरावही केला, असे अभयने उत्साहाने सांगितले. नरेंद्र मोदी स्टेडियमच्या कामाबद्दल बोलताना अभय म्हणाला, कामासाठी निवड झाल्यावर मी इंग्लंडच्या जोनाथन स्मिथ नावाच्या निष्णात व्यक्तीला सल्लागार म्हणून सोबत घेतले. काम सुरू करताना माती रेतीचा योग्य संगम करून पाण्याचा निचरा होणारे आऊटफिल्ड तयार करणे आणि त्याचे गवत अत्यंत चांगले तयार करणे हे ध्येय होते.  

गवताशी गप्पा मारत मी काम केले, ज्याने मुळे चक्क एक फुटापर्यंत खोल रुजली आहेत, हे सांगताना काम केल्याचे समाधान आणि आनंद होतो आहे. जगातील सर्वात भव्य क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीत आपला खारीचा वाटा आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो आहे. हे काम माझ्या एकट्याचे नाही, तर माझ्या संपूर्ण टीमचे आणि मैदानावर काम करणाऱ्या पुरुष आणि महिला माळ्यांचे योगदान सर्वात मोलाचे आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या