INDvsENG : आखाड्यातील ‘ट्रेलर’चा रोहित हिरो

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 13 February 2021

भारतीय उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेने वर्तवलेल्या अंदाजानुसार चेन्नईची खेळपटी आपले रंग दाखवू लागली आहे. त्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागल्यामुळे सुटकेची निःश्‍वास टाकण्यात आला.

चेन्नई : पहिल्याच दिवशी फिरकीस साथ देणारी खेळपट्टी... शुभमन गिल आणि विराट कोहलीचे भोपळे... रोहित शर्माचे दीड शतक; तर अजिंक्‍य रहाणेचे अर्धशतक आणि त्यांनी केलेली दीडशतकी भागीदारी... खेळ संपता संपता रिषभ पंतचा आक्रमक पवित्रा... अशा नाट्यमय घडामोडींचा पहिल्याच दिवशी झालेला ट्रेलर भारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटीचा पिक्‍चर किती रोमहर्षक असणार आहे, याची झलक दाखवणारा ठरला.

भारतीय उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेने वर्तवलेल्या अंदाजानुसार चेन्नईची खेळपटी आपले रंग दाखवू लागली आहे. त्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागल्यामुळे सुटकेची निःश्‍वास टाकण्यात आला. एकीकडे फलंदाजी कठीण होत असताना रोहित शर्माने जबरदस्त 161 धावांची खेळी केली. अजिंक्‍य रहाणेही फॉर्मात आला आणि त्यानेही 67 धावा फटकावल्या. या दोघांनी केलेल्या 162 धावांमुळे भारताने पहिल्या दिवसअखेर 6 बाद 300 धावा रचल्या. 

INDvsENG : टीम इंडिला रोहितच्या शतकाची साथ; रितिकासह प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर फुलवलं हास्य

पहिला दिवस 88 षटके आणि धावफलकावर 300 धावा म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाचे पारडे जड, असे सर्वसाधारण चित्र असते. भारतीयांनी ते मिळवलेही; परंतु 88 षटकांत बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. पहिल्या अर्ध्या तासातच चेंडू पडल्यावर खेळपट्टीवरची माती उडू लागल्याने रोहित शर्मा आणि अजिंक्‍य रहाणेच्या शानदार फलंदाजीचे मोल भारतासाठी वाढले आहे.

स्वीपचा वापर

फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्टीवर स्वीप या फटक्‍याचा वापर रामबाण असतो. रोहितने फिरकी गोलंदाज लिच आणि मोईन अली यांच्याविरुद्ध केला. पुढे सरसावत षटकार मारण्याचाही सफाईदारपणा दाखवला. त्यामुळे खेळपट्टीचे भय निघून गेले. याचा फायदा रहाणेलाही झाला. त्यानेही मुक्तपणे फटकेबाजी केली. हे दोघे मैदानात असेपर्यंत खेळपट्टी नगण्य ठरत होती; परंतु स्वीपचा एक फटका चुकला आणि रोहित बाद झाला. जमलेली मोठी भागीदारी फुटल्यावर दुसरा साथीदारही लगेचच बाद होण्याचा घटना अनेकदा घडल्या आहेत. आजही तसेच घडले आणि रहाणेही बाद झाला. 3 बाद 248 आणि अचानक 5 बाद 249 अशी अवस्था झाल्यावर भारताचा डाव अडचत येण्याची चिन्हे दिसू लागली; पण रिषभ पंतने पुन्हा चक्रे फिरवली आणि पाच चौकार व एका षटकारासह नाबाद 33 धावांची खेळी करून पुन्हा भारताचे वर्चस्व मिळवून दिले.
 


​ ​

संबंधित बातम्या