खेळपट्टी की सदोष फलदांजी? ब्रिटिशमध्येच मनभिन्नता

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 February 2021

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने कसोटीच्या लायकीची खेळपट्टी नव्हती, अशी टीका केली; पण लंडनमधील प्रसिद्ध गार्डियन वर्तमानपत्राने, इंग्लिश संघाने सुमार फलंदाजी केली, अशी टीका केली.

लंडन : अवघ्या दोन दिवसांत संपलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर खेळपट्टीला दोष देण्यात येत असले, तरी खेळपट्टी खराब होती की आपल्या फलंदाजांनी सुमार फलंदाजी केली, यावरून ब्रिटिश प्रसिद्धिमाध्यमांमध्ये वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने कसोटीच्या लायकीची खेळपट्टी नव्हती, अशी टीका केली; पण लंडनमधील प्रसिद्ध गार्डियन वर्तमानपत्राने, इंग्लिश संघाने सुमार फलंदाजी केली, अशी टीका केली. दोन दिवसांत झालेल्या खेळात इंग्लंड संघासमोर उत्तर नव्हते, असा मथळा त्यांनी दिला आहे.

अनेक गोष्टी विरुद्ध होत असताना कोणत्या गोष्टींना जबाबदार धरावे, याची उकल करणे कठीण आहे, असे म्हणत या वर्तमानपत्राने इंग्लंडच्या रोटेशन पॉलिसीवर जोरदार टीका केली. प्रमुख खेळाडूंना गरज नसताना देण्यात येणारी विश्रांती, परिस्थितीची पारख न होणे तसेच चेन्नईतील पराभवाचा हॅंगओव्हर कायम ठेवणे, असे मुद्दे या वर्तमानपत्राने मांडले आहेत. इंग्लंडने पहिल्या डावात 2 बाद 74 अशी सुरुवात केली होती. त्याचा फायदा इतर फलंदाजांना घेता आला नाही. भारतीय फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यात इंग्लंडचे फलंदाज अपयशी ठरले. भारतीय संघ निश्‍चितच उजवा ठरला, असाही उल्लेख ‘गार्डियन’ने केला आहे. इंग्लंड संघ अकार्यक्षम, असा मथळा देत ‘सन’ या वर्तमानपत्रानेही संघ निवडीवर टीका केली. 

INDvsENG विराट BCCI ची वकिली करतोय का? कूकचा संतप्त सवाल

खेळपट्टीबाबत मर्यादा ओलांडल्या

वर्तमानपत्रांनी दोन दिवसांत निकाल लागलेल्या मोदी स्डेडियमच्या खेळपट्टीला जबाबदार धरले आहे. खेळपट्टीबाबत भारताने खिलाडू वृत्तीच्या मर्यादा पार केला आहेत. ही कसोटी सामन्याची खेळपट्टी नव्हती, असे मत अँडी बन यांनी दी मिरर या वर्तमानपत्रात मांडले आहे. घरच्या संघाला फायदा होईल, अशी परिस्थिती निर्माण करणे समजण्याजोगे आहे; पण ही खेळपट्टी सुमार होती. ९० वर्षांनंतर इंग्लंड संघाचा दोन दिवसांत कसोटी सामन्यात प्रथमच पराभव झाला आहे, असा दाखला बन यांनी दिला आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या