INDvsENG : ‘अंतिम’ सामनाही अटीतटीचा होण्याची शक्‍यता

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 20 March 2021

'अंतिम’ मुकाबला असल्यामुळे भारतीय संघात बदल होण्याची शक्‍यता कमी आहे. मात्र राहुलला अजून एक संधी दिली जाणार की दुसऱ्या सामन्यातील सामनावीर ईशात किशनची निवड करणार, हा प्रश्‍न असेल.

अहमदाबाद : ‘नाणेफेक जिंका सामना जिंका’ हे सूत्र भारतीय संघाने चौथ्या सामन्यात मोडून काढले तरी ‘अंतिम’ सामन्यात नाणेफेकीचे महत्त्व कमी होणार नाही. रात्री पडणारे दव गोलंदाजीसाठी अडचणीचे असले तरीही भारतीय गोलंदाजांनी केलेली कमाल त्यांच्या आत्मविश्‍वासाला बळ देणारी ठरणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या तीन ट्‌वेन्टी-20 सामन्यांत सायंकाळी फारच कमी दव पडले होते, परंतु गुरुवारच्या सामन्यात मैदान ओले होईल एवढ्या प्रमाणात दव पडले होते, परंतु भारतीय गोलदाजांनी विजयाकडे कुच करणाऱ्या इंग्लंडला मार्ग अंतिम क्षणी रोखला आणि आठ धावांनी विजय मिळवला होता.

आजच्या सामन्यात अशाच प्रकारचे हवामान राहील आणि मोठ्या प्रमाणात दव पडेल असे अंदाज व्यक्त करण्यात आलेला नाही, त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्यावर भर असेल. पण पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली तर नाणेफेक गमावणाऱ्या संघासाठीही विजयाचा मार्ग कायम रहातो हे भारतीयांनी दाखवून दिले आहे.

‘अंतिम’ मुकाबला असल्यामुळे भारतीय संघात बदल होण्याची शक्‍यता कमी आहे. मात्र राहुलला अजून एक संधी दिली जाणार की दुसऱ्या सामन्यातील सामनावीर ईशात किशनची निवड करणार, हा प्रश्‍न असेल. गुरुवारच्या सामन्यात राहुलला सूर सापडत असल्याचे संकेत मिळत होते, परंतु 14 धावांसाठी त्याने 17 चेंडू घेतले होते. रोहित शर्माही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत आहे. त्यासाठी पदार्पणात शानदार खेळी करणाऱ्या किशनला संधी मिळू शकते.

सुंदरऐवजी दीपक चहर?

कालच्या सामन्यात भारत पाचच गोलंदाजांसह खेळला होता, एखाद्या गोलंदाजाची पिटाई झाल्यास सहावा पर्याय नव्हता, तसेच वॉशिंग्टन सुंदरने मुबलक धावा दिल्या होत्या. आता शार्दुलही चांगली फलंदाजी करत असल्यामुळे सुंदरऐवजी दीपक चहलची निवड होऊ शकते.

लक्ष्य इंग्लंड
टेन्टी-20 मालिका
आज अखेरचा सामना
मालिका स्थिती 2-2
वेळ : सायंकाळी 7
थेट प्रक्षेपण स्टार स्पोटस्‌
हवामानाचा अंदाज : सूर्यप्रकाश पण धुक्‍याची चादर, त्यामुळे सायंकाळी जास्त प्रमाणात दवाची शक्‍यता.


​ ​

संबंधित बातम्या