INDvsENG : इंग्लंडचा पलटवार की भारताचे फिरकीअस्त्र

सुनंदन लेले, सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 March 2021

आजपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत भारतालाही फलंदाजीत सुधारणा करणे आवश्‍यक
 

अहमदाबाद : गेल्या दोन कसोटी सामन्यात भारतीय फिरकीसमोर नांगी टाकणारा इंग्लंडचा संघ चौथ्या कसोटीत जोरदार पलटवार करायच्या तयारीत आहे. मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही, या उक्तीप्रमाणे इंग्लंडचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधले आव्हान संपुष्टात आल्याने बेधडक खेळून भारतीय संघाला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे; तर दुसरीकडे विराट कोहली आणि त्याचे सहकारी विजयाची लय घट्टं पकडून ठेवायच्या प्रयत्नात फलंदाजीत लक्षणीय सुधारणा करण्याचे ध्येय मनात बाळगून आहेत.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्या गुरुवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा चौथा कसोटी सामना सुरू होत आहे. गेल्या दोन सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांनी मदत करणाऱ्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांची चांगलीच भंबेरी उडवली आहे. अश्विन आणि अक्षर पटेलची दहशत मनात साठवत इंग्लंडचे फलंदाज चौथ्या कसोटीत काय सुधारणा करतात, यावर सामना किती दिवस चालणार, याचे भवितव्य अवलंबून आहे.

INDvsENG : आम्ही तीन दिवसांत हरलो तेव्हा कोणी खेळपट्टी बघायला गेले नव्हते : विराट कोहली

बुमराऐवजी उमेश?

जसप्रीत बुमराच्या जागी बहुतेक उमेश यादवला संधी देईल. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी कुलदीप यादवला जागा मिळायची शक्‍यता कमी वाटत आहे. म्हणजेच भारतीय संघात जास्त बदल केले जाणार नाहीत, असे संकेत विराट कोहलीने दिले आहेत. मोदी स्टेडियमवरच चौथा कसोटी सामना होताना खेळपट्टी बदलली जाणार आहे, तरी खेळपट्टीच्या स्वभावात बदल होण्याची शक्‍यता कमी आहे. पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ मिळायची शक्‍यता लक्षात घेता नाणेफेक जिंकणारा कर्णधार अर्थात पहिली फलंदाजी करणे पसंत करेल. सामन्याच्या पहिल्या डावात शक्‍य तेव्हढ्या जास्त काळ खेळपट्टीवर उभे राहून मोठी धावसंख्या उभारण्याची सरळ साधी योजना दोनही संघ करतील. 

प्रेक्षकांचे ‘घर’ उन्हात

दिवसाचा खेळ सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदाबादमध्ये उन्हाळा वाढू लागला आहे. त्याचा परिणाम खेळाडूंप्रमाणे प्रेक्षकांवरही होणार आहे. कारण मैदानातील बऱ्याच प्रेक्षकांना उन्हाचा तडाखा सहन करत सामन्याचा आनंद घ्यावा लागणार आहे.

लक्ष्य इंग्लंड

चौथी कसोटी आजपासून
ठिकाण :
नरेंद्र मोदी स्टेडियम, मोटेरा अहमदाबाद
थेट प्रक्षेपण : सकाळी 9.30 पासून स्टार स्पोर्टस्‌
मालिकेतील स्थिती : भारताची 2-1 आघाडी
हवामानाचा अंदाज : जास्तीचे तपमान 37.5 असण्याची शक्‍यता. पाऊस नसला तरी खेळाडूंसमोर घामाच्या धारांचे आव्हान
खेळपट्टीचा अंदाज : पहिल्या दिवसापासून चेंडू फिरक घेण्याची शक्‍यता, पण लाल चेंडू गुलाबी चेंडूपेक्षा कमी वेगाने स्कीड होतो, ही फलंदाजांसाठी जमेची बाब. 


​ ​

संबंधित बातम्या